राजकोट - आठवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेत कोसळून मृत्यू झाल्याने खळबळ उडाली. ही घटना राजकोटच्या गोंडल रोडवरील अमृतलाल विरचंद जसानी शाळेत सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली. कडाक्याची थंडी असल्यामुळे ही मुलगी कुडकुडत होती. रिया किरणकुमार सागर असे त्या विद्यार्थिनीचे नाव आहे. विद्यार्थिनीला तात्काळ पंडित दीनदयाळ रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. मुलीच्या मृत्यूने तिची आई जानकीबाई सागर यांना धक्काच बसला. त्यांनी शाळेच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.
शाळेचे स्वेटर घालण्याची सक्ती करू नये : थंडीच्या दिवसात शाळेत विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सकाळच्या शाळा उशिराने भरवण्यात याव्यात. माझ्या मुलीसोबत जे झाले, ते इतर कोणासोबतही होऊ नये, त्यामुळे शाळेने काळजी घेणे गरजेचे असल्याचे विद्यार्थिनीच्या आईने म्हटले आहे. शाळेच्या व्यतिरिक्त दुसरा स्वेटर घालून आल्यास त्यांना शाळेत येऊ द्यावे, असेही पीडित आईने यावेळी सांगितले. माझ्या मुलीला कोणताही आजार नव्हता. मात्र रक्त गोठल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या आईने केला आहे.
राज्य सरकारने मागितला अहवाल : मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारही सतर्क झाले आहे. सरकारने शिक्षण विभागाकडून या प्रकरणाचा अहवाल मागितला आहे. राजकोट जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेत कोणते स्वेटर घालून यायचे याबाबत शाळा प्रशासनाने सक्ती करु नये. कोणतेही स्वेटर घालून विद्यार्थी शाळेत आले, तरी त्यांना रोखू नये, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी यावेळी बजावले आहे.
शवविच्छेदन अहवाल पेंडींग : शाळेत कोसळून मृत्यू झालेल्या रियाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला. तिचा व्हिसेरा एफएसएलमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. याबाबत एफएसएलचा अहवाल अद्यापही आलेला नाही. अहवाल आल्यानंतरच या मुलीचा मृत्यू कशामुळे झाला आहे, त्याचे कारण कळेल. या मुलीला कोणताही आजार नसल्याची माहिती तिच्या घरच्यांनी दिली आहे. त्यासह तिने दोन्ही कोरोना लस घेतल्याचेही पुढे आले आहे. त्यामुळे मुलीचा मृत्यू नेमका कसामुळे झाला, याचे कारण अद्यापही गुलदस्त्यात आहे. दरम्यान मुलीचा मृत्यू झाल्यामुळे तिचे कुटुंबिय आक्रोश करत आहेत.
हेही वाचा - Mumbai Crime : छोटा राजनचे बॅनर लावत पावती देऊन खंडणी वसूली; 5 जणांना अटक