शिमोगा - कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यात जिलेटीन साठ्याचा मोठा स्फोट झाला. स्फोटात कमीत-कमी सहा जण ठार झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हा स्फोट जिलेटीन काड्यांनी भरलेल्या ट्रकमध्ये झाल्याचे सांगितले जात आहे. या स्फोटामुळे भुकंपासारखे धक्के जाणवले व अनेक घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
हा स्फोट गुरुवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास झाला. सुरुवातील आठ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली होती. मात्र, नंतर फक्त सहा जणांचा मृत्यू झाला अशी माहिती मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा यांनी दिली.
शिमोगा जवळील अबलागेरे गावानजिक रेल्वे क्रशर प्लांट हूणसोंडी येथे स्फोट झाला. यात बिहार राज्यातील सहा मजूर ठार झाले आहेत. शिमोगा ग्रामीणचे आमदार अशोक नाईक यांनी सांगितले, की जिलेटीनने भरलेल्या ट्रकमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाचे कारण अद्याप समजले नाही.
एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, जिलेटिन वाहतूक करणाऱ्या ट्रकमध्ये हा स्फोट झाला. ट्रकमध्ये असणाऱ्या सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की परिसरात भुकंपासारखे धक्के जाणवले. मृतांचा आकडा वाढू शकतो.
खोदकामासाठी जात होता ट्रक -
सांगितले जात आहे, की जिलेटिनच्या कांड्या खोदकामासाठी नेण्यात येत होत्या. रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला. या स्फोटामुळे शिमोगाबरोबरच चिक्कमंगलुरु आणि दावणगिरी जिल्ह्यातही धक्के जाणवले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की स्फोट इतका मोठा होता की, घरांच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या त्याचबरोबर रस्त्यांना भेगा पडल्या. स्फोटामुळे भूकंपासारखे धक्के जाणवले व भूगर्भ वैज्ञानिकांशी संपर्क करण्यात आला.
पोलीसांनी एका बॉम्बविरोधी पथक बोलविण्यात आले आहे. शिमोगाचे जिल्हाधिकारी केबी शिवकुमार यांनी सांगितले, की परिसराला सील करण्यात आले आहे.