नवी दिल्ली - आशिया आणि युरोपमधील माल वाहून नेणारे पनामा ध्वजाचे 'द एव्हर गिव्हन' हे जहाज सुएझ कालव्यात अडकले होते. सहा दिवसानंतर जहाजाला मोकळ करण्यात अखेर यश आले होते. इजिप्त प्रशासनाने 'द एव्हर गिव्हन' जहाजाच्या मालकाकडे 550 मिलियन अमेरिकी डॉलरची भरपाई मागितली आहे. तर यापूर्वी सुएझ कालवा प्राधिकरणाने सुमारे 920 दशलक्ष डॉलर्सच्या नुकसान भरपाईची मागणी केली होती.
इजिप्शियातील इस्माईलिया शहरात सुएझ कालवा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी रविवारी पत्रकार परिषद घेतली. सुएझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची सुटका करण्यासाठी कामगारांनी काम केले. यादरम्यान जहाजाची सुटका करताना ठार झालेल्या कामगाराला नुकसान भरपाई देणे बाकी आहे.
पश्चिम जपानमधील रहिवासी असलेल्या जहाजाच्या मालकाने 150 मिलियन डॉलर्स देण्याची ऑफर दिली आहे. आम्ही जहाज मालकाशी चांगले संबंध राखू इच्छित असून आणि वाटाघाटी सुरू ठेवण्याचा हेतू आहे. मात्र, आमच्या हक्कांकडे दुर्लक्ष करणार नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कोर्टाच्या निर्णयाअंतर्गत, भरपाईचे पैसे मिळेपर्यंत 'द एव्हर गिव्हन' जहाज इजिप्तमध्येच राहिल.
कधी अडकले होते जहाज?
आशिया आणि युरोपमधील माल वाहून नेणारे पनामा ध्वजाचे 'द एव्हर गिव्हन' हे जहाज सुएझ कालव्यात मार्च महिन्यात अडकले होते. त्यानंतर 29 मार्चला जहाजाची सुटका करण्यात आली. कोरोना साथीच्या आजाराने आधीच प्रभावित असलेल्या जागतिक वाहतुकीवर आणि व्यापारावर 'द एव्हर गिव्हन' जहाज अडकल्याने तीव्र परिणाम झाला होता. तसेच कालव्यात जगभरातील 300 हून अधिक मालवाहू जहाज आणि तेल कंटेनर अडकले होते. हे जहाज मोठे असल्याने सुवेझ कालवा बंद झाला होता. यामुळे खनिज तेलाच्या किमती सहा टक्क्यांनी वाढल्या. 'द एव्हर गिव्हन' जहाजाला 25 भारतीय चालवत होते.
सुवेझ कालव्याविषयी...
भूमध्य समुद्र व लाल समुद्रांना जोडणारा हा कालवा 193.3 किलोमीटर लांबीचा आहे. या जलमार्गाने तब्बल 30 शिपिंग कंटेनर जातात. जगातील 12 टक्के वस्तूची या कालव्यातून वाहतूक केली जाते. सुएझ कालवा हा इजिप्त देशातील एक कृत्रिम कालवा आहे. त्याचे बांधकाम इ.स. 1869 साली पूर्ण करण्यात आले होते. सुएझ कालव्याचे उत्तरेकडील टोक बुर सैद शहराजवळ तर दक्षिण टोक सुएझच्या आखातावरील सुएझ शहराजवळ स्थित आहे. सुएझ कालव्यामुळे युरोप व आशिया या दोन खंडांदरम्यान जलद सागरी वाहतुक शक्य झाली आहे. सुएझ कालवा सुरु होण्यापुर्वी युरोपातुन आशियाकडे जाणाऱ्या बोटींना आफ्रिका खंडाला सुमारे 7000 किमी लांबीचा वळसा घालुन जावे लागत असे.
हेही वाचा - 'द एव्हर गिव्हन' : सुवेझ कालव्यात अडकलेल्या जहाजाची अखेर सुटका