चंदिगढ : दिल्लीमध्ये प्रजासत्ताकदिनी आयोजित करण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर परेडमध्ये काही प्रमाणात हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. यातच लाल किल्ल्यावर काही आंदोलकांनी चढून आपला झेंडा फडकवल्यामुळे यावर सर्व स्तरातून टीका होत आहे. हरियाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर यांनीदेखील या घटनेची निंदा करत, यामागे चीनचा हात असल्याचे म्हटले आहे.
ईटीव्हीशी केलेल्या विशेष चर्चेवेळी गुर्जर म्हणाले, की या सर्व घटनेमागे चीनचा हात असणे अगदी स्पष्ट आहे. कारण त्याचा चीनला फायदा होणार आहे. सध्या भारत-चीनमधील तणावाची परिस्थिती असो, किंवा गुंतवणुकीच्या दृष्टीने असो, याचा चीनला फायदाच होणार आहे. त्यामुळे या आंदोलनांमागे चीनचा हात असणे स्पष्ट आहे.
आंदोलनामागे कम्युनिस्टांचाही हात..
यावेळी गुर्जर असेही म्हणाले, की शेतकरी संघटनांच्या नेत्यांचा इतिहास पाहिला, तर बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. या आंदोलनामागे कम्युनिस्टांचाही हात आहे. चीन आणि भारतामध्ये झालेल्या युद्धानंतर भारतातील कम्युनिस्टांनी उघडपणे चीनचे समर्थन केले होते.
सध्या देशातील परिस्थिती पाहता, आणि ज्याप्रकारे सर्व घटना घडत आहेत ते पाहता या आंदोलनामागे चीनचा हात असणे स्वाभाविक आहे. कोरोना नंतरच्या काळात ज्याप्रमाणे सर्व जग भारताकडे चीनपेक्षा मोठी बाजारपेठ म्हणून पाहत आहे, त्याने चीनचे नुकसान होत आहे.
आरोपींवर कडक कारवाई करावी..
कंवरपाल म्हणाले, की आंदोलनकर्त्यांचा हाच उद्देश्य होता की पोलिसांनी त्यांच्यावर हल्ला करावा, जेणेकरुन त्यांना जास्त प्रमाणात हिंसा करता यावी. लाल किल्ल्यावर जे झाले, त्यामध्ये सहभागी असणाऱ्या आरोपींवर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
शेतकऱ्यांना परत जाण्याचे आवाहन..
यावेळी कंवरपाल यांनी दिल्लीतील शेतकऱ्यांना परत जाण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, की तुमच्या आंदोलनाचा खरा चेहरा आता समोर आला आहे, त्यामुळे तुम्ही आंदोलन मागे घेत परत जावे असे ते यावेळी म्हणाले.