नवी दिल्ली ED Summons Arvind Kejriwal : दिल्ली उत्पादन शुल्क धोरणातील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयानं (ईडी) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दुसऱ्यांदा चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. ईडीनं नोटीस बजावून 21 डिसेंबर रोजी केजरीवाल (Delhi Liquor Scam) यांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी (Delhi Excise Policy Matter) बोलावलं आहे.
केजरीवाल यांना दुसऱ्यांदा समन्स : ईडीनं अरविंद केजरीवाल यांना यापूर्वी ३० ऑक्टोबरला समन्स पाठवलं होतं. २ नोव्हेंबरला चौकशीसाठी केजरीवाल यांना बोलावलं होतं. मात्र, केजरीवाल हे गैरहजर राहिले होते.आपल्याला कोणत्या अधिकारात चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे? याची माहिती द्यावी, असं तीन पानी पत्र लिहून केजरीवाल यांनी ईडी मुख्यालयात चौकशीसाठी जाण्यास असमर्थता व्यक्त केली होती. यानंतर ईडीनं सोमवारी पुन्हा केजरीवाल यांना समन्स पाठवलं आहे.
सीबीआयनं केली होती चौकशी : अरविंद केजरीवाल हे 19 डिसेंबर रोजी होणाऱ्या 'इंडिया' आघाडीच्या बैठकीनंतर पुढील 10 दिवसांसाठी विपश्यनेसाठी दिल्लीबाहेर जाणार आहेत. अशा स्थितीत ईडीनं पाठवलेल्या नोटीसवर मुख्यमंत्री केजरीवाल काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे. यापूर्वीही सीबीआयनं कथित दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांची चौकशी केली होती. यावर्षी एप्रिल महिन्यात ही चौकशी झाली होती.
'आप'चे दोन मोठे नेते तुरुंगात : कथित दारू घोटाळ्यातील संशयित आरोपी माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया गेल्या फेब्रुवारीपासून तिहार तुरुंगात आहेत. त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टानं फेटाळला आहे. याआधी दिल्लीच्या कनिष्ठ न्यायालयात सहा वेळा जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र, त्या सर्व फेटाळण्यात आल्या आहेत. याच प्रकरणात 'आप'चे खासदार संजय सिंह देखील तुरुंगात आहेत.
हेही वाचा -