पाटणा : जमीन घोटाळ्या प्रकरणी राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) या प्रकरणी त्यांच्यावर कारवाई सुरू केली आहे. सोमवारी ईडीद्वारे लालू प्रसाद यादव यांची संपत्ती जप्त करण्यात आली.
ईडीने तिसऱ्यांदा संपत्ती जप्त केली : ईडीने लालू प्रसाद यादव यांची तिसऱ्यांदा संपत्ती जप्त केली आहे. यावेळी त्यांच्या गाझियाबाद आणि बिहारमधील सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या. ईडीने बिहारच्या पाटणा येथील बिहटा, महुआबाग, दानापूर येथील मालमत्ता जप्त केल्या आहेत. याशिवाय लालू प्रसाद यादव यांची कन्या हेमा यादव यांची उत्तर प्रदेशातील मालमत्ताही जप्त करण्यात आली.
जमीन घोटाळ्या प्रकरणी कारवाई : अंमलबजावणी संचालनालयाने बिहारचे उपमुख्यमंत्री आणि लालू यादव यांचे पुत्र तेजस्वी यादव यांच्या दिल्लीतील 'डी ब्लॉक'ची मालमत्ताही जप्त केली. या मालमत्तेची सरकारी किंमत 6 कोटी 2 लाख रुपये एवढी आहे. महत्वाचे म्हणजे, मालमत्तेचा बाजारभाव यापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. 10 मार्च 2023 रोजी ईडीने लालू यादव यांच्या 15 ठिकाणांवर एकाच वेळी छापे टाकले होते. त्यावेळी त्यांच्या नातेवाईकांच्या घरांचीही झडती घेण्यात आली होती. ईडीने तेजस्वी यादवच्या दिल्लीतील न्यू फ्रेंड्स कॉलनीतील डी - 1088 या बंगल्यावरही छापा टाकण्यात आला होता.
लालूंच्या निकटवर्तीयांवर छापे : 10 मार्च 2023 रोजी टाकलेल्या छाप्यात ईडीने 1 कोटी रुपयांची रोख संपत्ती जप्त केली होती. गुन्ह्यातून कमावलेली 600 कोटींची संपत्ती शोधून काढण्यात यश मिळाले असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले होते. तेव्हापासून लालू प्रसाद यादव आणि त्यांच्या निकटवर्तीयांवर अनेक छापे पडले आहेत. या प्रकरणी लालू यादव आणि त्यांच्या पत्नी राबडी यादव यांची चौकशी देखील करण्यात आली आहे.
काय आहे जमीन घोटाळा : 2004 ते 2009 या काळात लालू यादव रेल्वेमंत्री असताना हा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. यादरम्यान रेल्वेत चुकीच्या पद्धतीने भरती करण्यात आली. नोकरीच्या बदल्यात उमेदवारांकडून जमीन आणि सदनिका घेण्यात आल्या. नंतर या जमिनी लालू यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांना हस्तांतरित करण्यात आल्या. यासंदर्भात सीबीआय आणि ईडी सातत्याने कारवाई करत आहे.
लालूंचे गेल्या वर्षी किडनीचे ऑपरेशन झाले : लालू प्रसाद यादव यांचे गेल्या वर्षी किडनीचे ऑपरेशन झाले होते. त्यानंतर आता ते स्वस्थ दिसत आहेत. त्यांनी पाटण्यात झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला देखील हजेरी लावली होती. नुकताच त्यांचा बॅडमिंटन खेळतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या आरोग्यासंबंधी सर्व अटकळांना पूर्णविराम मिळाला आहे.
हे ही वाचा :