रायपूर (छत्तीसगड) : छत्तीसगडमध्ये या वर्षी निवडणूक होणार आहे. तर दुसरीकडे राज्यात अंमलबजावणी संचालनालयाचे छापे थांबण्याचे नाव घेत नाहीत. मंगळवारी पहाटे ईडीने पुन्हा एकदा छापा टाकला. नेत्यांसह ईडीची टीम आता अनेक व्यावसायिकांच्याही घरी पोहोचली आहे. महासमुंदचे आमदार आणि संसदीय सचिव विनोद सेवालाल चंद्राकर यांच्या घरी ईडीचे अधिकारी दोन वाहनांतून पोहोचले आहेत. तसेच ईडीचे एक पथक सिव्हिल लाईन येथील गोरे कॉम्प्लेक्स येथील काँग्रेस कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल यांच्या कार्यालयातही पोहोचले आहे. काही व्यावसायिकांच्या घरांवरही ईडीचे छापे पडत आहेत. रायपूर तसेच बिलासपूर, रायगड आणि भिलाई येथूनही ईडीच्या कारवाईची माहिती आली आहे.
व्यापाऱ्यांच्या घरी ईडीचे छापे : छत्तीसगडमध्ये बऱ्याच दिवसांपासून ईडीचे अधिकारी ठाण मांडून आहेत. ईडी राज्यातील मनी लाँड्रिंग आणि कोळसा वाहतूक प्रकरणी कारवाई करत आहे. याप्रकरणी काही अधिकारी आणि व्यापारी तुरुंगातही गेले आहेत. ईडी काँग्रेसच्या अनेक नेत्यांवरही नजर ठेवून आहे. यावेळी महासमुंद येथील आमदाराशिवाय ईडीने जमिनीशी संबंधित व्यावसायिकांच्या घरांवरही छापे टाकले आहेत. रायपूरच्या शक्तीनगरमधील व्यापारी कमल शारदा आणि जमिनीशी संबंधित व्यावसायिक सुरेश बांधे यांच्या घरी ईडी पोहोचली आहे. त्यांच्या घरी कागदपत्रांचा शोध सुरू आहे.
काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीही झाली होती छापेमारी : ईडीने काँग्रेसच्या राष्ट्रीय अधिवेशनापूर्वीही काँग्रेस नेत्यांच्या घरांवर छापे टाकले होते. त्यावेळी काँग्रेस नेत्यांनी या प्रकरणावरून जोरदार गोंधळ घातला होता. ईडीने कामगार विभागाचे अध्यक्ष सनी अग्रवाल, भिलाईचे आमदार देवेंद्र यादव, बिलाईगडचे आमदार चंद्रदेव राय, काँग्रेसचे प्रदेश कोषाध्यक्ष राम गोपाल अग्रवाल, काँग्रेसचे प्रवक्ते आरपी सिंह, काँग्रेस नेते गिरीश दिवांगन आणि काँग्रेसचे युवा नेते विनोद तिवारी यांच्या घरांवर छापे टाकले होते. तेव्हापासून त्यांना सतत चौकशीसाठी बोलावले जात आहे. मात्र, छापे टाकल्यानंतर चौकशी करूनही कोणालाच अटक करण्यात आलेली नाही. ईडीच्या त्या छाप्यानंतर आज पुन्हा कारवाई करण्यात येत आहे.
हेही वाचा : Atiq Ahmed In Court : उमेश पाल हत्याकांड प्रकरण, माफिया अतिक आज न्यायालयात होणार हजर