अखनूर (जम्मू आणि काश्मीर) - जम्मू-काश्मीरमधील अखनूर जिल्ह्यातील कनाचक भागात सुरक्षा दलाने एक पाकिस्तानी ड्रोन पाडले. या ड्रोनमधून स्फोटक साहित्य करण्यात आली आहेत. तत्पूर्वी बुधवारी, बकरीदच्या दिवशी सतवारी भागात एक संशयास्पद ड्रोन दिसले होते.
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानकडून भारतीय हद्दीत शस्त्रे आणि ड्रग्ज पुरवण्यासाठी मानवरहित ड्रोनचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे भारतीय सुरक्षा दलाची डोकेदुखी वाढली आहे. काही दिवसांपूर्वीच जम्मूमधील हवाई दल स्टेशनवर ड्रोन हल्ला झाला होता. या संशयी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीर प्रशासनाने श्रीनगरमध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली आहे.
पोलिसांना ड्रोन संबंधित कामांवर लक्ष ठेवण्यास सांगितले. ड्रोन किंवा तत्सम इतर उपकरणांवर बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी प्रशासनाने जम्मू विभागातील सीमावर्ती राजौरी जिल्ह्यामध्ये ड्रोनच्या वापरावर बंदी घातली होती.
लष्कराची डोकेदुखी वाढली -
दहशतवाद विरोधी मोहीम हाती घेतल्यानंतर दहशतवाद्यांना हत्यारे आणि दारू गोळ्याची कमतरता भासू लागली होती. मात्र, ड्रोनच्या माध्यमातून तस्करी सुरू झाल्याने त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात रसद पुरवठा होऊ लागला आहे. परिणामी लष्कराची डोकेदुखी वाढू लागली आहे. तस्करीसाठी शुत्रराष्ट्रांकडून वापरण्यात येणारे ड्रोन बाजारात सहज उपलब्ध होतात. ते कोणीही खरेदी करू शकते. यामध्ये प्रत्येक ड्रोनच्या माध्यमातून अनेक बंदूका किंवा किलोपेक्षा जास्त ड्रग्स तस्करी केली जाऊ शकते. याशिवाय भारतीय सैनिकांच्या ठाव-ठिकाण्याचाही या ड्रोनच्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध लावता येतो. ड्रोनचा दहशतवादी कारवाया आणि घुसखोरीसाठी वापर केला जातो.