नवी दिल्ली : 'दि ऑस्ट्रेलियन' या दैनिकाने भारतातील कोरोना परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत एक लेख लिहिला होता. यावरुन केंद्र सरकारने दैनिकाला चांगलेच फटकारले आहे. पुराव्याअभावी कोणतीही गोष्ट छापू नका, असा इशारा देणारे पत्र इंडियन हाय कमिशनने दैनिकाच्या संपादकांना लिहिले आहे.
'गर्दीप्रिय पंतप्रधानांनी आपल्या देशाला लॉकडाऊनमधून बाहेर काढत सर्वनाशाकडे नेले आहे. भारतातील कोरोना परिस्थिती कशा प्रकारे बिघडत चालली आहे, त्याबाबत ही कथा आहे..' अशा आशयाचे ट्विट करत दि ऑस्ट्रेलियनने आपला लेख शेअर केला होता.
![Do not publish such baseless articles: India to 'The Australian'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11552092_indhc-2.jpg)
कॅनबेरामधील इंडियन हाय कमिशनने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. अशा प्रकारचे लेख लिहिणे टाळून, कोरोना परिस्थितीचे भारताने केलेले नियोजन यावर एक लेख लिहावा असे पत्र दि ऑस्ट्रेलियनला कमिशनने पाठवले आहे. ख्रिस्तोफर डोरे या मुख्य संपादकांना लिहिलेल्या पत्रात उच्च उपायुक्त पी. एस. कार्थीगेयन म्हणाले, की "आपल्यासारख्या प्रतिष्ठित दैनिकाने अशा प्रकारचा निराधार, द्वेषपूर्ण लेख लिहिल्याचे पाहून धक्का बसला. भारत सरकारच्या कोणत्याही अधिकाऱ्यासोबत चर्चा न करता, किंवा सत्य परिस्थितीचा आढावा न घेता हा लेख तुम्ही लिहिला आहे."
![Do not publish such baseless articles: India to 'The Australian'](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/11552092_indhc-1.jpg)
'दि ऑस्ट्रेलियन'ने २५ एप्रिलला आपला लेख प्रसिद्ध केला होता.
हेही वाचा : निकालाच्या दिवशी विजय यात्रांवर बंदी; निवडणूक आयोगाचा निर्णय