नवी दिल्ली : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील काही दिवसांपासून रोज तीन लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे जगभरातून भारताकडे मदतीचा ओघ सुरु झालाय. अनेक देशांनी भारताला मदत करण्यासंदर्भातील पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकाही भारताच्या मदतीसाठी पुढे सरसावली आहे. आता माहिती तंत्रज्ञान श्रेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या गूगल आणि मायक्रोसॉफ्ट कंपनी मदतीसाठी पुढे आली आहे.
गूगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतातील कोरोना परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तसेच, भारतासाठी १३५ कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. 'भारतातील कोविडचे संकट वाढत असल्याचे पाहून मी अस्वस्थ आहे', असेही त्यांनी म्हटले आहे. याबाबतचे ट्विट सुंदर पिचाई यांनी केले आहे.
तर, मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला हे सुद्धा भारताच्या मदतीसाठी पुढे आले आहेत. ‘भारतातील सद्य परिस्थितीमुळे मी खूप दु: खी आहे. अमेरिकन सरकारने भारताला मदत केल्याबद्दल त्यांचे आभार. मायक्रोसॉफ्ट व्यवसायातील मदतीसाठी आवाज, यंत्रणा आणि तंत्रज्ञानाचा वापर चालू ठेवेल. तसेच, ऑक्सिजन एकाग्रता उपकरणांच्या खरेदीला समर्थन देईल’, असे नाडेला यांनी म्हटले आहे. त्यांनीही याबाबतचे ट्विट केले आहे.