कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने तिकिट नाकारल्यानंतर टीएमसीच्या नेत्या सोनाली गुहा यांनी भाजपाचा हात धरला आहे. सोनाली गुहा या टीएमसी सुप्रिमो ममता बॅनर्जी यांच्या विश्वासातील होत्या. आतापर्यंत त्या चार वेळेस आमदार झाल्या आहेत. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांनी विनंती केल्यानंतर मी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याचे सोनाली यांनी सांगितले. आज दुपारी 1 वाजता त्या जाहीरपणे भाजपात प्रवेश करतील.
तृणमूल काँग्रेसमध्ये योग्य मान दिला जात नाही, असा आरोप सोनाली यांनी केला. मी टीएमसीसाठी सर्व प्रयत्न केले होते. 'दीदी' (ममता बॅनर्जी) आणि इतरांनाही हे चांगले माहित आहे. आता मी नव्या पक्षातही तितकेच स्वत: ला झोकून देऊन काम करेल, असे त्या म्हणाल्या. तसेच यावेळी तृणमूल काँग्रेसने तिकीट दिले नसल्याची माहिती कळल्यावर मला धक्का बसला. मला या निर्णयाबद्दल माहिती देण्यात आली नव्हती आणि विश्वासात घेतले नव्हते, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात सत्तेत येण्यासाठी भाजपा आणि तृणमूल काँग्रेसकडून जोरदार तयारी सुरू आहे. गेल्या एका महिन्याभरात तृणमूलमध्ये नाराज असलेल्या अनेक नेत्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. राज्यातील बॅनर्जी यांचे दहा वर्षांची सत्ता संपवण्यासाठी भाजपा आक्रमक मोहीम राबवित आहे. दरम्यान, रविवारी अभिनेते मिथून चक्रवर्ती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर भाजपात प्रवेश केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -
पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडेल. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिल, चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल. तर 2 मेला निकाल जाहीर होतील.