नवी दिल्ली - काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करा, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. दिल्लीमधील जुन्या नांगल भागातील मागासवर्गीय असलेल्या 9 वर्षीय मुलीवर बलात्कार झाला होता. या पीडितेची ओळख उघड केल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला आहे. राहुल गांधी यांनी पीडितेच्या आई-वडिलांशी बोलत असल्याचा फोटो ट्विट केला होता.
राहुल गांधी यांना अटक करण्याची विनंती करणारी याचिका मकरंद सुरेश म्हाडेलकर यांनी दाखल केली आहे. राहुल गांधी यांनी पीडितेच्या आई-वडिलांची भेट घेऊन त्याचा फोटो ट्विट केला होता. त्यामुळे पॉक्सो कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे याचिकाकर्त्याने म्हटले आहे. पीडितेची ओळख उघड केल्याने पॉक्सो कायद्यातील कलमानुसार 23(2) राहुल गांधींना सहा महिने ते एका वर्षांपर्यंत कैद होऊ शकते. जुवेनाइल जस्टिस अॅक्टमधील कलम 74 नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी याचिकाकर्त्याने केली आहे.
हेही वाचा-PM-Kisan Scheme: किसान सन्मान निधीच्या पुढच्या हफ्त्याचं आज लाभार्थ्यांना वाटप
राहुल गांधींचे ट्विटर अकाउंटही बंद झाले होते...
काही दिवसांपूर्वी दिल्लीमधील जुना नांगल येथे स्मशान घाटावर 9 वर्षांची मुलगी वॉटर कुलरचे पाणी पिण्यासाठी गेली होती. तेव्हा तिच्यावर बलात्कार करून हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबाची भेट घेतली होती. या भेटीचा फोटो राहुल गांधी यांनी ट्विट केला होता. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने हे ट्विट काढण्याचे 4 ऑगस्टला आदेश दिले होते. त्यानंतर राहुल गांधींचे ट्विटर अकाउंट काही काळापुरते स्थगित करण्यात आले होते.
हेही वाचा-देशात कोरोनाचे आढळले 35,499 रुग्ण, 447 जणांचा मृत्यू