नवी दिल्ली : सरकारने आम्हाला लवकरात लवकर थकीत वेतन द्यावे, अशी मागणी दिल्लीतील महानगरपालिका शिक्षक संघटनेने बुधवारी केली. असे न केल्यास, आम्ही लसीकरणाच्या कामामध्ये मदत करणार नसल्याचा इशाराही या शिक्षकांनी दिला आहे. संघटनेच्या वरिष्ठ उपाध्यक्षा विभा सिंह यांनी याबाबत माहिती दिली आहे.
पाच महिन्यांपासून मिळाले नाही वेतन..
आम्हाला गेल्या पाच महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. तसेच, गेल्या सहा महिन्यांपासून सेवानिवृत्त शिक्षकांना पेन्शनही मिळाली नाही. एप्रिल महिन्यापासून आम्ही कोरोनाशी संबंधित सर्व कामे करत आहोत. तरीही आम्हाला आमचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे आता वेतन न मिळाल्यास, कोरोना लसीकरणाशी संबंधित कोणतेही काम आम्ही करणार नाही; असे विभा म्हणाल्या.
लसीकरण महत्त्वाचे, पण आम्हालाही पोट आहे..
देशासाठी हे लसीकरण किती महत्त्वाचे आहे हे आम्हाला माहिती आहे. मात्र, आमच्या आणि आमच्या कुटुंबीयांच्या पालन पोषणासाठी पैशांची गरज आहेच. आमच्या मागण्यांना अद्याप राज्य किंवा केंद्र सरकारनेही काही उत्तर दिले नाही, त्यामुळे आम्ही हे पाऊल उचलल्याचे सिंह यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : कर्नाटकमध्ये गोवंश हत्याबंदी कायद्यांतर्गत पहिली अटक; दोन गुन्हे दाखल