दिल्ली : राजधानीतील तिहार कारागृहात पुन्हा एकदा गँगवार उफाळले असून या गँगवारमध्ये कुख्यात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाचा खात्मा करण्यात आला. टिल्लू ताजपुरियाने वकिलाच्या वेशात दिल्लीतील रोहिणी न्यायालयात गोळीबार करुन दोन कुख्यात गँगस्टरचा बळी घेतला होता. टिल्लूवर योगेश टुंडा आणि त्याच्या साथिदारांनी मंगळवारी सकाळी हल्ला केला. हल्ल्यानंतर टिल्लूला तात्काळ दिल्लीच्या दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केल्याची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.
मंगळवारी सकाळी झाला हल्ला : दिल्लीच्या पश्चिम विभागाचे अतिरिक्त पोलीस उपायुक्त अक्षत कौशल यांनी पोलिसांना मंगळवारी सकाळी ७ वाजता दीनदयाल उपाध्याय रुग्णालयातून या हल्ल्याबाबत माहिती मिळाल्याचे सांगितले. यात तिहार कारागृहातून रुग्णालयात आणलेल्या दोन अंडरट्रायल कैद्यांवर हल्ला झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिल्याचे कौशल यांनी स्पष्ट केले. त्यापैकी एकाला बेशुद्ध अवस्थेत आणण्यात आले होते, मात्र त्याला मृत घोषित करण्यात आले. सुनील उर्फ टिलू असे त्याचे नाव आहे. त्याचा साथिदार रोहितला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर उपचार सुरू असून तो धोक्याबाहेर असल्याची माहिती उपायुक्त कौशल यांनी दिली.
रोहिणी न्यायालयात टिल्लूने केला होता गोळीबार : रोहिणी न्यायालयात कुख्यात गँगस्टर टिल्लू ताजपुरियाने गोळीबार केला होता. त्यामुळे या गोळीबार प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून टिल्लू ताजपुरियाचे नाव होते. 2021 मध्ये वायव्य दिल्लीतील रोहिणी न्यायालयाच्या 207 क्रमांकाच्या खोलीत झालेल्या गोळीबारात गँगस्टर जितेंद्र मान उर्फ गोगी आणि इतर दोन जण ठार झाले होते.
वकिलाच्या वेशात आला होता टिल्लू : जितेंद्र मान उर्फ गोगी अनेक गुन्हेगारी प्रकरणात गुंतलेला असून तिहारच्या तुरुंगात होता. 2021 मध्ये गोगीला न्यायालयात हजर केले जात होते. तेव्हा टिल्लूने वकिलांच्या वेशात आवारात प्रवेश केला. यावेळी टिल्लूने न्यायालयातच गोगीवर अंदाधूंद गोळीबार केला होता. दिल्ली पोलिसांच्या काउंटर इंटेलिजन्स पथकानेही हल्लेखोरांवर गोळीबार केला. या गोळीबारात दोन गँगस्टर ठार झाले होते. गोळीबारात गोळीने अनेक जखमा झालेल्या गोगीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
गँगस्टर टिल्लूवरही झाला होता हल्ल्याचा प्रयत्न : यापूर्वी २०२१ मध्ये टिल्लू ताजपुरिया याच्यावर काही गुंडांनी एका हल्ल्याची योजना आखली होती. तथापि, मोहित, सागर, हर्ष आणि सुमित या चार गुंडांना पकडण्यात दिल्ली पोलिसांना यश आले होते. त्यामुळे दिल्ली पोलिसांना हा हल्ला रोखण्यात यश आले. गोगी, अशोक प्रधान आणि लॉरेन्स बिश्नोई यांच्या टोळीतील गँगस्टर होते.
हेही वाचा - Intelligence Report On Moist : नक्षलवाद्यांनी विचारधारा टिकवण्यासाठी घेतली विविध संघटनांची मदत, गुप्तचर विभागाच्या अहवालात खुलासा