नवी दिल्ली - केंद्रीय कृषी कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक महिना होऊन गेला आहे. अद्याप शेतकरी आंदोलावर तोडगा निघाला नाही. सिंघू, टिकरी सीमा आणि बुरारी येथील निरंकारी मैदानावर शेतकरी हजारोंच्या संख्येने जमले आहेत. यातील बुरारी मैदानावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी कांद्याची शेती सुरू केली आहे. यासोबतच अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी दुभाजकामधील जागेतही शेती सुरू केली आहे.
मोकळं बसून करणार तरी काय?
बुराडी येथील निरंकारी मैदानावर मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले असून कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. 'एक महिन्यापासून येथे बसून आहे. मोकळे बसून करणार तरी काय? त्यामुळे आम्ही शेती करायला सुरूवात केली आहे. जर मोदींनी आमचे म्हणणे नाही ऐकले तर सगळ्या मैदानावर शेती पिकवू' असे एका शेतकऱ्याने सांगितले.
सहा महिने सीमेवर ठिय्या देण्याची शेतकऱ्यांची तयारी -
सहा महिने पुरेल एवढं राशन बरोबर आणल्याचे शेतकरी सांगत आहेत. कडाक्याच्या थंडीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आंदोलनस्थळी अनेक सुविधाही उपलब्ध झाल्या आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. खालसा एड या संघटनेने शेतकऱ्यांसाना गरजेच्या वस्तू पुरवण्यासाठी मॉल सुरू केला आहे. काही संघटनांनी शेतकऱ्यांसाटी मसाज सेंटर सुरू केले आहे. कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशिनही सीमेवर दाखल झाले आहे. सर्व शेतकरी आंदोलनस्थळीच जेवण बनवत आहेत. त्यासाठीचा भाजीपाला स्वयंसेवी संस्था पुरवत आहेत. आत्तापर्यंत भारतात अशा प्रकारचे आंदोलन झाले नसून शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम आहेत.
पुन्हा सरकारसोबत शेतकऱ्यांची चर्चा -
सरकारने आंदोलकांना चर्चेचे आवाहन करून संघटनांच्या सोईनुसार वेळ आणि ठिकाण निश्चित करण्यास सांगितले होते. त्यानुसार सरकारशी चर्चा करण्यासाठी 29 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजताची वेळ निश्चित केली आहे. यासाठी दिल्लीच्या विज्ञान भवनाच्या जागेची निवड करण्यात आली असून पुन्हा चर्चा होणार आहे. याआधी पाच चर्चेच्या फेऱ्या झाल्या असून त्यातून तोडगा निघाला नाही. त्यानंतर शेतकऱ्यांनी चर्चा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सरकारकडून चर्चेचे आमंत्रण देणे चालूच होते. त्यामुळे आता पुन्हा शेतकरी चर्चेसाठी तयार झाले आहेत.