नवी दिल्ली Parliament Security Breach : संसद सुरक्षेतील गैरप्रकार प्रकरणातील सहाही आरोपींना गुरुवारी (28 डिसेंबर) रोजी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं. हजर झाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आरोपीच्या पॉलीग्राफ चाचणीची मागणी केली. आरोपींना हजर करताना दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, "सर्व आरोपींना विचारलं पाहिजे, की ते पॉलीग्राफ चाचणीसाठी तयार आहेत का." मात्र, न्यायालयानं या प्रकरणी अद्याप कोणताही निर्णय दिलेला नाही. कोर्ट या अर्जावर २ जानेवारीला सुनावणी करणार आहे.
काय आहे पॉलीग्राफी चाचणी : आरोपींकडून सत्य माहिती काढून घेण्यासाठी या चाचणीचा उपयोग करण्यात येतो. चाचणी दरम्यान आरोपीला बेशुद्ध केलं जात नाही, तर मशिनद्वारे आरोपीच्या हृदयाचे ठोके, रक्तदाबावर लक्ष ठेवलं जातं. आरोपीच्या अंगावर मशीन लावून त्याला प्रश्न विचारले जातात. आरोपीच्या संमतीशिवाय ही चाचणी होऊ शकत नाही. त्यासाठी न्यायालयाकडून आरोपींच्या संमतीनं आदेश घ्यावे लागतात. त्यानंतरच पॉलीग्राफ चाचणी करता येते.
सर्व आरोपी हजर : या प्रकरणात सागर शर्मा, नीलम आझाद, महेश कुमावत, ललित झा, डी. मनोरंजन, अमोल शिंदे यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. सध्या हे सर्व आरोपी 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत राहणार आहेत. दिल्ली पोलिसांनी या आरोपींवर UAPA च्या कलम 16A अंतर्गत आरोप दाखल केलं आहेत. 13 डिसेंबर रोजी दोन आरोपींनी संसदेच्या व्हिजिटर गॅलरीतून सभागृहात उडी मारली होती. त्यानंतर काही वेळातच एका आरोपीनं पिवळ्या रंगाचा कलर स्प्रे सभागृहात फवारला होता. या घटनेनंतर एकच गोंधळ उडाला होता. त्यावेळी काही खासदारांनी या तरुणांना पकडून मारहाणही केली होती.
हेही वाचा -