नवी दिल्ली : जागतिक तापमानवाढीविरोधात काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे वृत्त काही तासांपूर्वी देण्यात येत होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी स्वतःच पुढे येत, या एफआयआरमध्ये ग्रेटाचे नाव नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. खरेतर, या एफआयआरमध्ये कोणत्याही विशिष्ट व्यक्तीचे नावच नसल्याचा खुलासा पोलिसांनी पत्रकार परिषद घेत केला.
एफआयआरमध्ये नाही कोणाचेच नाव..
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेक न्यूज पसरवणाऱ्या काही सोशल मीडिया अकाऊंट्स विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये कोणाच्याही नावाचा विशेष उल्लेख नाही. खोटी बातमी पसरवणे, तसेच देशद्रोहाचे गुन्हे या अकाऊंट्स विरोधात दाखल करण्यात आले आहेत.
'टूल किट' तयार करणाऱ्यावर गुन्हा दाखल..
दिल्ली पोलिसांनी सांगितले, की शेतकरी आंदोलनासंदर्भात सामाजिक तणाव निर्माण करणारी एक 'टूल किट' सध्या समाजमाध्यमांवर फिरत आहे. ही टूल किट कोणी तयार केली त्या अज्ञाताविरोधातही आम्ही गुन्हा दाखल केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, हे काम खलिस्तानवादी संघटनांचे असल्याचे समोर आल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : आमच्या देशात काय चाललंय आम्ही बघू; पॉप सिंगरने यात पडू नये - आठवलेंची रिहानावर टीका