नवी दिल्ली - दिल्ली-मुंबई महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज झाले आहे. या मार्गावरील सोहना ते दौसा हा टप्पा पूर्ण झाला आहे. देशाची राजधानी दिल्ली आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबई यांना जोडणारा हा नेत्रदीपक महामार्ग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे. या मार्गावरील इतर टप्प्यांचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे.
- दिल्ली ते मुंबईत अंतर केवळ 12 तासात : राजधानी दिल्ली ते आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा महामार्ग जगातील सर्वात लांब महामार्ग असणार आहे. या महामार्गाची लांबी 1390 किलोमीटर आहे. हा महामार्ग जर्मन तंत्रज्ञानाने बांधला जात असून, पुढील पन्नास वर्षे या महामार्गाची झीज होणार नसल्याचा दावा केला जात आहे. या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी चार्जिंग स्टेशन देखील उपलब्ध राहणार आहेत. सध्या स्थितीला हा महामार्ग आठ पदरी आहे मात्र भविष्यात याला बारा पदरी बनवता येणे शक्य राहणार आहे.
- सहा राज्यांना होणार फायदा - दिल्ली-मुंबई महामार्गावर 120 किलोमीटर प्रतितास या वेगाने वाहने धावणार आहेत. दिल्ली ते मुंबई सध्या स्थितीला 24 तासात पार करता येते, परंतु या मार्गानंतर हे अंतर 12 तासातच गाठता येणे शक्य होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकल्पासाठी 1.1 लाख कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. हा महामार्ग महाराष्ट्रसह इतर पाच राज्यांमधून जाणार आहे. दिल्ली, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या सहा राज्यातून हा महामार्ग जाणार आहे.
- राजस्थान, हरियाणा, मध्यप्रदेशला होणार फायदा : या गुंतवणुकीचा मोठा फायदा राजस्थानच्या लोकांना होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. ते म्हणाले की, सरकार जेव्हा महामार्ग, रेल्वे, विमानतळ, बंदरे यामध्ये गुंतवणूक करते, करोडोंची घरे बांधते, वैद्यकीय महाविद्यालये बांधते तेव्हा सर्वांना बळ मिळते. याचा सर्वांनाच फायदा होतो. ते म्हणाले की एक्सप्रेसवेच्या आजूबाजूला ग्रामीण हॉटस्पॉट तयार केले जात आहेत, याचा फायदा राजस्थान तसेच हरियाणा आणि मध्य प्रदेशला होणार आहे.
- दिल्ली - जयपूर प्रवास सुकर होणार : राजस्थान हे देशातील पर्यटकांसाठी पूर्वीपासूनच आकर्षणाचे केंद्र राहिले आहे. आता आकर्षण आणखी वाढणार आहे. दिल्ली ते जयपूर हा प्रवास आता तीन तासांनी कमी होणार आहे. पहिल्या टप्प्यात कार्यान्वित होत असलेल्या एक्स्प्रेस वेची लांबी 247 किमी आहे. 12 हजार 173 कोटी रुपये खर्चून ते तयार करण्यात आला आहे.
- एक्स्प्रेसवेमध्ये काय आहे खास? : मुंबई - दिल्ली एक्सप्रेसवे हा देशातील सर्वात लांब हायवे आहे. जर तुम्हाला हा प्रवास ईव्हीने करायचा असेल तर या एक्स्प्रेस वेवर विविध ठिकाणी ईव्ही चार्जिंग पॉइंटची सुविधा उपलब्ध असेल. जर्मन तंत्रज्ञानावर आधारित हा एक्स्प्रेस वे इतका प्रगत आहे की, आता दिल्ली ते मुंबई हा प्रवास निम्म्या कालावधीत होणार आहे. याशिवाय कमी अंतरामुळे इंधनाचा वापरही कमी होईल. जनावरे रस्त्यावर येऊ नयेत व संभाव्य अपघात टाळता यावेत यासाठी ठिकठिकाणी प्राण्यांचे पासेस तयार करण्यात आले आहेत.
- स्ट्रेचेबल हायवे लेन : हा 8-लेन एक्स्प्रेस वे देशातील पहिला स्ट्रेचेबल हायवे आहे. तो गरज भासल्यास 12 लेनपर्यंत वाढवता येऊ शकतो. यावर प्रत्येक 100 किलोमीटर अंतरावर ट्रॉमा सेंटरची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिल्लीहून मुंबईला जाताना दर ५० किलोमीटरवर एक थांबा नक्कीच असेल. हा महामार्ग टोलच्या बाबतीत वेगळा आहे, कारण यावर तुम्हाला अनेक ठिकाणी टोलनाक्यावरून जावे लागणार नाही. या महामार्गावरून बाहेर पडल्यावर किलोमीटरनुसार टोल भरावा लागेल.
- वन्यजीवांसाठी ओव्हरपास सुविधा : एक्स्प्रेस वेवर 40 पेक्षा जास्त मोठे इंटरचेंज असतील, जे अलवर, दौसा, कोटा, इंदूर, जयपूर, भोपाळ, वडोदरा आणि सुरत या शहरांशी कनेक्टेड असतील. द्रुतगती मार्गाच्या बांधकामासाठी 12 लाख टन स्टील वापरण्यात येणार आहे, जे 50 मोठ्या पुलांइतके आहे. 2018 मध्ये या प्रकल्पाचे प्रारंभिक बजेट 98,000 कोटी रुपये होते. या प्रकल्पातून 10 कोटी रोजगार निर्माण होणार आहे. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा आशियातील पहिला आणि जगातील दुसरा द्रुतगती मार्ग आहे, जिथे वन्यजीवांसाठी ओव्हरपासची सुविधा प्रदान करण्यात आली आहे.