नवी दिल्ली - लहान मुलांवरील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी थांबविण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यावर आज सुनावणी झाली. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि डीजीसीआय यांना नोटीस बजावली आहे. तसेच, दिल्ली उच्च न्यायालयाने सध्या मुलांवर सुरु असलेल्या लसींच्या चाचण्यांना बंदी घालण्यासही नकार दिला आहे.
वकील संजीव कुमार यांनी दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. केंद्राची अधिसूचना रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेत केली. चाचणी होणाऱ्या मुलांमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबीयांबरोबर लस चाचणीसाठी केलेले करार, चाचणीसाठी तयार सर्व 525 मुलांची यादी आणि त्यांच्या कुटुंबीयांची माहिती या याचिकेत मागितली आहे.
लहान मुलांचाही कोरोनामुळे जातोय बळी -
भारतासह जगभरात कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. जगभरात दररोज कोरोनाग्रस्तांचे आकडे हजाराच्या पटीने वधारत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही अधिक आहे. यात लहान मुलांचाही कोरोनामुळे बळी जात आहे. कोरोनावर तयार करण्यात आलेल्या लसींच्या चाचण्यांमध्ये तरुणांपासून वृद्धांपर्यंत विविध वयोगटातील स्वयंसेवकांचा समावेश आहे. मात्र, लहान मुलांसाठी लस नाही. यासाठी लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्याची परवानगी भारत बायोटेकला देण्यात आली आहे.
तिसऱ्या लाटेचा अंदाज -
चाचणी यशस्वी झाल्यानंतर लहान मुलांच्या लसीकरणासाठी देखील परवानगी देण्यात येईल. कॅनडामध्ये लहान मुलांचे लसीकरण करण्यात येत आहे. देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संकटात लहान मुले अधिक प्रभावित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर लसीकरण हाच एकमेव पर्याय असल्याने लहान मुलांवर दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणी करण्यात येत आहे.
हेही वाचा - तरुण तेजपाल प्रकरणाचा निकाल पुन्हा 21 मे पर्यंत तहकूब