नवी दिल्ली : यमुना नदीची पाणी पातळी आता 207.89 मिटरवर पोहोचली आहे. यमुना नदीची 207.49 ही आतापर्यंतची उच्चांकी पाणी पातळी असून ती 1978 मध्ये नोंद करण्यात आली होती. दरम्यान यमुना नदीच्या पुरामुळे हजारो नागरिकांना फटका बसला आहे. या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात येत आहे. यमुना नदीच्या पुराने रौद्र रुप घेतले असून पुरामुळे एक तरुण तब्बल 22 तास झाडावर अडकून पडला होता. अथक प्रयत्नानंतर त्याला खाली उतरवण्यात दिल्ली पोलिसांना यश आले आहे. जितेंद्र असे या पुरात अडकलेल्या तरुणाचे नाव आहे. तर दुसरीकडे यमुना नदीच्या पाणी पातळीने नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
मुख्यमंत्री केजरीवालांनी बोलावली तातडीची बैठक : यमुना नदीच्या पुरामुळे नागरिकांची वाताहत झाली आहे. अनेक नागरिक पुराच्या पाण्यामुळे अडकून पडले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पूर परिस्थितीवर उपाययोजना करण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. दिल्ली पोलिसांनी पूरग्रस्त भागात कलम 144 लागू केले आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नागरिकांना सखल भागात न जाण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांनीही अनेक ठिकाणी पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. भाजपचे अनेक खासदार पूरग्रस्त भागात जाऊन पाहणी करणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. भाजपच्यावतीने पूरग्रस्त नागरिकांना मदत साहित्यही वाटप करण्यात येणार आहे.
नायब राज्यपालांनी दिली पूरग्रस्त भागांना भेट : नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी पूरग्रस्त भागांना भेट दिली आहे. नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी यमुनेच्या काठावरील पूरग्रस्त भागांना भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आहे. एनडीआरएफची टीम कोणत्याही परिस्थितीत मदत करण्यास तयार असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. पुरात अडकलेल्या नागरिकांना लवकर बाहेर काढले जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
दिल्ली सरकारने केली नाही ठोस व्यवस्था : नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी मंगळवारी यमुना बाजारसह अनेक भागांना भेट दिली होती. यावेळी त्यांनी दिल्ली सरकारवर हल्लाबोल केला होता. दिल्ली सरकारने पावसाच्या पाण्याचा निचरा करण्याबाबत कोणतीही ठोस व्यवस्था केली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी तुंबल्याची समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.
हरियाणातून पाणी सोडल्याने दिल्लीत पूर : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पुराबाबत पत्र लिहिल्याची माहिती बुधवारी दिली. दिल्लीत आलेला पूर हा दिल्लीतील पावसाच्या पाण्यामुळे आला नाही, तर हरियाणातील हथिनी कुंड प्रकल्पातील पाणी सोडल्यामुळे आल्याचे स्पष्ट केले. यमुनेची पाणी पातळी हरियाणातील पाणी सोडल्यामुळे वाढली आहे. त्यामुळे हथिनी कुंड प्रकल्पातून मर्यादित पाणी सोडण्यात यावे, अशी विनंतीही मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा -