नवी दिल्ली Delhi Earthquake : आज (६ नोव्हेंबर) संध्याकाळी ४.१५ च्या सुमारास राजधानी दिल्ली आणि आसपासच्या परिसरात पुन्हा एकदा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर याची तीव्रता ५.६ नोंदवण्यात आली. या भूकंपाचा केंद्रबिंदू नेपाळमध्ये होता, असं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) नं सांगितलं. या भूकंपामुळे आतापर्यंत कोणत्याही नुकसानीचं वृत्त नाही.
चार दिवसात दुसरा भूकंप : मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या चार दिवसांत दिल्लीत दुसऱ्यांदा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. दिल्ली, नोएडा, ग्रेटर नोएडा, गाझियाबाद, गुरुग्राम, फरीदाबादसह अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. दिल्लीशिवाय उत्तराखंडचं पिथौरागढ आणि लखनऊमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या आधी शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्रानुसार, त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.४ इतकी मोजण्यात आली होती. रात्री ११.३० वाजता भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपाचा केंद्रबिंदूही नेपाळमध्येच होता.
नेपाळमध्ये वारंवार भूकंप होतात : आकडेवारीनुसार, नेपाळमध्ये गेल्या ११ महिन्यांत ४ पेक्षा जास्त तीव्रतेचे ७० हून अधिक भूकंप झाले आहेत. यापैकी ५ तीव्रतेचे १३ भूकंप होते. तर ६ भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६ किंवा त्याहून अधिक होती. २२ ऑक्टोबर रोजी आलेल्या ६.१ तीव्रतेच्या भूकंपामुळे काठमांडूमध्ये २० घरांचं नुकसान झालं होतं. या आधी नेपाळमध्ये २०१५ सालीही भीषण भूकंप झाला होता. त्याची तीव्रता ७.८ इतकी होती होती.
भूकंपाची तीव्रता कशी मोजली जाते : भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर मोजली जाते. भूकंपाच्या लहरींची तीव्रता मोजण्यासाठी रिश्टर स्केल हे गणितीय स्केल आहे, त्याला रिश्टर मॅग्निट्युड टेस्ट स्केल म्हणतात. रिश्टर स्केलवर, भूकंप १ ते ९ पर्यंत त्याच्या केंद्रापासून मोजले जातात. भूकंपाच्या वेळी पृथ्वीमधून बाहेर पडलेल्या ऊर्जेवर आधारित हे प्रमाण तीव्रतेचं मोजमाप करतं.
हेही वाचा :