नवी दिल्ली : जीममध्ये ओळख झालेल्या महिलेवर माथेफिरने गोळीबार केल्याने महिला ठार झाली आहे. ही घटना दिल्लीतील डाबरी परिसरात गुरुवारी रात्री घडली. या महिलेवर गोळीबार केल्यानंतर माथेफिरुने स्वत:वरही गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेची ओळख पटल्याची माहिती पोलिसांनी दिली. महिलेची आणि या हल्लेखोराची जीममध्ये ओळख झाली होती. आशिष असे महिलेवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोर तरुणाचे नाव आहे. एकतर्फी प्रेमातून हा हल्ला करण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र हा गोळीबार एकतर्फी प्रेमातून झाल्याची अद्याप कोणतीही माहिती नसल्याचे द्वारका परिसराचे पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी सांगितले.
महिलेची घराबाहेर गोळ्या झाडून हत्या : दिल्लीतील डाबरी परिसरात गुरुवारी रात्री महिलेला हल्लेखोर आशिषने घराबाहेर बोलावले होते. ही महिला घराबाहेर आल्यानंतर आशिष आणि त्या महिलेत काहीतरी वाद झाला. त्यानंतर आशिषने सदर महिलेच्या डोक्यात गोळी मारली. घराबाहेर गोळी झाडल्याच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली. नागरिकांनी तातडीने महिलेला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी महिलेला मृत घोषित केले. डाबरी परिसरात गोळीबारामुळे घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
हल्लेखोर तरुणाची आत्महत्या : महिलेवर गोळीबार केल्यानंतर आशिषने आपले घर गाठले. यानंतर त्याने आपल्या डोक्यातही गोळी झाडून आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात उघड झाले. पोलिसांनी आशिषच्या घरी धाव घेतली असता, ही बाब उघड झाली. त्यामुळे पोलिसांनी दोन्ही मृतदेह दीन दयाल उपाध्याय रुग्णालयात फाठवले आहेत. आशिष हा आपल्या आई वडिलांसह महिलेच्या घराशेजारी राहत होता. तर महिला आपल्या पतीसह राहत होती.
जीममध्ये झाली होती दोघांची ओळख : डाबरी परिसरातील रेणू या महिलेवर गोळीबार झाल्याची घटना गुरुवारी रात्री पावणे नऊच्या सुमारास घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. परिसरातील 42 वर्षीय महिलेला गोळी लागल्याचे सांगण्यात आले होते. त्यांच्या घराजवळ गोळी झाडण्यात आली असून या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी अनेक पथके तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी दिली. हल्लेखोर आणि महिलेची एका जिममध्ये मैत्री झाली होती. हे दोघेही एकत्र जिममध्ये जात असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्राथमिक तपासात हे प्रकरण परस्पर वैमनस्यातून असल्याचे पोलिसांना दिसत असल्याचेही पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी यावेळी स्पष्ट केले.
पोलीस तपासणार सीसीटीव्ही फुटेज : दिल्लीत घराबाहेर महिलेवर गोळीबार झाल्याच्या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हल्लेखोराने कसा गोळीबार केला, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरचे सीसीटीव्ही फुटेज तपासणार असल्याची माहिती दिली आहे. या परिसरात इतर ठिकाणी लावण्यात आलेले सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात येणार आहे. या प्रकरणी डाबरी पोलीस ठाण्याच्या व्यतिरिक्त एएटीएससह आणि ऑपरेशन सेलचे पथकेही तैनात करण्यात आल्याची माहितीही पोलीस उपायुक्त एम हर्षवर्धन यांनी यावेळी दिली.
हेही वाचा -