नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल(CM Arvind Kejriwal) यांच्याविषयीचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर(Social Media) टाकल्याप्रकरणी भाजप नेते संबित पात्रांविरोधात(Sambit Patra) एफआयआर नोंदविण्याचे आदेश दिल्लीतील तीस हजारी न्यायालयाने दिले आहेत. महानगर न्यायदंडाधिकारी ऋषभ कपूर यांनी हे आदेश दिलेत.
संबित पात्रांवर आरोप
याविषयी आम आदमी पक्षाच्या प्रवक्ता आतिशी मर्लेना यांनी याचिका दाखल केली होती. संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवालांविषयी शेतकऱ्यांशी संबंधित एक प्रक्षोभक व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्याचे याचिकेत म्हटले होते. बनावट व्हिडिओ अपलोड करून संबित पात्रा यांनी अरविंद केजरीवाल यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आला आहे. या व्हिडिओमुळे समाजात अशांतता पसरण्याची शक्यताही याचिकेतून वर्तविण्यात आली आहे.
पोलीस ठाण्यातही केली होती तक्रार
आतिशी यांनी दिल्लीतील इंद्रप्रस्थ पोलीस ठाण्यात 2 फेब्रुवारी रोजी याबद्दल तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर काहीही कारवाई करण्यात आली नाही असेही याचिकेत म्हटले आहे. त्यानंतर आतिशी यांनी तीस हजारी कोर्टात याचिका दाखल केली.