नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल सरकारला फटकारले आहे. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून न्यायालयाने केजरीवाल सरकारवर आक्षेप नोंदवले आहेत. 'दिल्ली लवकरच कोरोना कॅपिटल बनेल' अशा शब्दांत न्यायालयाने केजरीवाल सरकारला खडसावले. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने दिल्ली सरकारला कोरोना स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत.
दिल्ली सरकार अनेक दावे करत आहे. कोरोना चाचण्या वाढवल्या असल्याचे दिल्ली सरकार म्हणते. मात्र, वास्तवात दिल्लीतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, असा आरोप न्यायालयाने केला आहे.
बुधवारी दिल्लीत ६ हजार ८४२ कोरोना रुग्णांची नोंद झाली असून एकूण बाधितांची संख्या 4 लाख 09 हजार 938वर पोहोचली आहे.
दिल्लीत कोरोनाची तिसरी लाट - केजरीवाल
राजधानी दिल्लीतील सध्याचे कोरोना रुग्ण पाहता ही कोरोनाची तिसरी लाट आहे असे म्हणता येईल, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केले आहे. सप्टेंबर ते ऑक्टोबर दरम्यान रुग्णसंख्या कमी झाली होती. आम्ही सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून आहोत. शक्य ती सर्व पावले आम्ही उचलू. रुग्णालयात आवश्यक खाटा असून काहीच कमतरता नाही, असेही ते म्हणाले.