नवी दिल्ली : ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) स्पुटनिक-५ या रशियन कोरोना लसीच्या वापराला परवानगी दिली आहे. देशात केवळ आपत्कालीन मर्यादित परिस्थितीच या लसीचा वापर करण्याची परवानगी असणार आहे. यासोबतच काही अटीही डीसीजीआयने लागू केल्या आहेत. यानंतर देशात वापरली जाणारी ही तिसरी लस ठरली आहे.
यापूर्वी जानेवारीमध्ये डीसीजीआयने भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन, आणि ऑक्सफोर्डच्या कोव्हिशील्डला देशात परवानगी दिली होती. त्यानंतर सोमवारी रशियाच्या स्पुटनिकलाही परवानगी मिळाली. याविषयी एका तज्ज्ञांच्या समितीने केलेल्या शिफारसीनुसार हा निर्णय घेण्यात आला.
जगभरामध्ये कोरोना विषाणूचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या वाढतच चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. सुरुवातीला महाराष्ट्रात कोरोनाची वाईट परिस्थिती होती. परंतु आता देशातील बर्याच राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने होऊ लागला आहे. देशात कोरोना लसीकरण करण्यात येत आहे. मात्र, लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर स्पुटनिक-व्ही या लसीला आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील सहा ते सात महिन्यांमध्ये स्पुटनिक-५चे सुमारे दहा कोटी डोस आयात करण्यात येणार आहेत.
लसीची नोंदणी करणारा रशिया पहिला देश -
हैदराबादमधील फार्मा कंपनी डॉ. रेड्डीज लॅबने रशियन डायरेक्ट इन्वेस्टमेंट फंडासोबत स्पुटनिक-५ लस भारतात तयार करण्यासाठी करार केला आहे. स्पुटनिक-५ ही लस करोनावरील लढाईत सहायक ठरणार आहे. स्पुटनिक-५ कोरोना विषाणुच्या लढ्यात 91.6 टक्के कार्यक्षम आहे. कोरिया, ब्राझील आणि चीनसारख्या इतर देशांमध्ये स्पुटनिक व्हीचे उत्पादन यापूर्वीच सुरू झाले आहे. 11 ऑगस्ट रोजी जगातील प्रथम कोविड - 19 लसीची नोंदणी करणारा रशिया हा पहिला देश ठरला. रशियाच्या या लसीचे नाव स्पुटनिक-5 असून ते रशियाच्या पहिल्या उपग्रहाच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. भारतात याची चाचणी आणि वितरण करण्याचे हक्क डॉ. रेड्डीज लॅबने घेतले आहेत.
हेही वाचा - शिवसेना नेते संजय राऊत बुधवारी बेळगावमध्ये; शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन