नवी दिल्ली : भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन या कोरोना लसीच्या पुढील चाचण्यांसाठी डीसीजीआयने परवानगी दिली आहे. सध्या १८ वर्षांवरील नागरिकांमध्ये या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. यापुढील दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यासाठी परवानगी मिळण्याची प्रतिक्षा भारत बायोटेक करत होते.
दिल्ली एम्स, पाटणा एम्स, आणि नागपूरमधील मेदित्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस याठिकाणी ५२५ सहभागींवर या चाचण्या घेण्यात येणार आहेत.
जलद नियामक प्रस्ताव म्हणून भारत बायोटेकची चाचण्यांची मागणी विषय तज्ज्ञ समिती १९ समोर (एसईसी) मंगळवारी मांडण्यात आली. या समितीने चर्चेनंतर भारत बायोटेकला दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी सशर्त परवानगी दिली.
कोव्हॅक्सिन ही संपूर्ण भारतीय बनावटीची कोरोनावरील लस आहे. हैदराबादमधील भारत बायोटेक ही संस्था या लसीचे उत्पादन घेत आहे. भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी संयुक्तपणे या लसीची निर्मिती केली आहे. सध्या कोव्हॅक्सिनचा वापर १८ वर्षांवरील व्यक्तींच्या लसीकरणासाठी करण्यात येतो आहे.
हेही वाचा : 'माध्यमांवर आवर घाला' म्हणत दाखल केली याचिका; उच्च न्यायालय म्हणाले 'रिमोट तर तुमच्याच हातात'