मुंबई - दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह परिसरातील सी ग्रीन हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर यासंदर्भात मुंबई पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. डेलकर यांनी ५ जुलै २०२० रोजी युट्युब शेअर केलेल्या व्हिडिओतून काही आरोप केले आहेत. त्याचा त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील मजकुराशी बराच साम्य असल्याचे तपासात समोर आले आहे.
मोहन डेलकर यांनी लिहिलेली सहा पानांची 'सुसाईड नोट' कालच पोलिसांना मिळाली असून यामध्ये डेलकर यांनी दादरा-नगर हवेलीमधील काही उच्चपदस्थ राजकारणी, प्रशासकीय अधिकाऱ्यांचे व पोलिसांची नावे लिहिली आहेत. दादरा-नगर हवेलीमधून आदिवासी भागाचे नेतृत्व करणारे मोहन डेलकर यांनी त्यांना जाणून-बुजून प्रशासकीय अधिकारी पोलीस व काही राजकारण्यांकडून लक्ष्य केले जात असल्याचे चिठ्ठीमध्ये लिहिले असल्याचे पोलीस सूत्रांनी म्हटले आहे.
युट्युबवरील एका व्हिडिओतून केले होते आरोप
एक व्हिडिओ डेलकर यांनी पाच जुलै 2020 रोजी युट्युबवर पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीतील बऱ्याच गोष्टींचा उल्लेख केलेला होता. 21 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी मोहन डेलकर यांनी मुंबईतील सी-ग्रीन हॉटेलमध्ये खोली बुक केली होती. यावेळेस त्यांचा अंगरक्षक व वाहनचालक सोबत होते. सोमवारी सकाळी डेलकर यांच्या वाहन चालकाने त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता मोबाईलवर संपर्क न झाल्यामुळे त्याने हॉटेलमधील त्यांच्या खोलीचा दरवाजा ठोठावला होता. मात्र, दरवाजा उघडत नसल्यामुळे हॉटेल व्यवस्थापनाला सांगून त्याने दरवाजा उघडण्यास सांगितले होते. यानंतर डेलकर यांचा पंख्याला लटकलेला मृतदेह त्यांच्या वाहन चालकाने पाहिल्यानंतर यासंदर्भात स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आलेली होती. फॉरेन्सिक तज्ञांच्या एका पथकाने घटनास्थळी येऊन काही नमुने हस्तगत केले असून याचा अहवाल लवकरच पोलिसांना दिला जाणार आहे.