नवी दिल्ली : सणांच्या आधी नरेंद्र मोदी सरकारने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी मोठी भेट जाहीर केली आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली, ज्यामध्ये महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याचबरोबर मोफत धान्य योजनेची मुदतही वाढवण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोदी सरकारने डीएमध्ये चार टक्के वाढ केली असून ती 34 टक्क्यांवरून 38 टक्के करण्यात आली आहे. ही वाढ जुलै ते डिसेंबर २०२२ पर्यंत वैध असेल. कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 38 टक्के दराने महागाई भत्ता आणि सवलतीचा लाभ मिळेल. ही दरवाढ ७व्या केंद्रीय वेतन आयोगाच्या ( 7th Pay Commission ) शिफारशींच्या अंतर्गत स्वीकारलेल्या सूत्रावर आधारित आहे.
केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना 34 टक्के दराने महागाई भत्ता दिला जात आहे. परंतु, महागाईचा भडीमार पाहता सरकारने त्यात चार टक्क्यांनी वाढ करून ३८ टक्के केली आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरच्या पगारासह नवीन डीएचे संपूर्ण पैसे दिले जातील. ऑक्टोबर महिन्यात कर्मचाऱ्यांना त्यांची मागील तीन महिन्यांची सर्व थकबाकीही देण्यात येणार आहे.