जयपूर : बिपरजॉय चक्रीवादळाचा प्रभाव राजस्थानमध्ये सातत्याने दिसून येत आहे. चक्रीवादळामुळे राजस्थानमधील अनेक भाग पाण्याखाली गेले आहेत. संततधार पावसामुळे अनेक नद्यांना उधाण येत आहे. रविवारी पालीच्या बेडल नदीत स्कॉर्पिओ गाडीतील तरुणाचा बुडून मृत्यू झाला. मृत तरुण हा माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या मुलाचा ड्रायव्हर असल्याचे सांगण्यात येत असून तो फालना येथून दिल्लीला जात असताना हा अपघात झाला. तरुणाचा मृतदेह बाहेर काढण्यात आला असुन मृतदेह फलना रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
देसुरीमध्ये ६ जणांची सुटका : पाली येथील देसुरी भागातील करनवा गावात ६ जणांची सुटका करण्यात आली आहे. पाली नदीत अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी तहसीलदार स्वत: नदीवर पोहोचले असुन सुचना करीत आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टरवर स्वार असलेले सहा जण करनवा नदीत अडकले होते. यानंतर देसुरी तहसीलदार कैलाश इनानिया यांनी स्वतः नदीत जाऊन अडकलेल्यांची सुटका केली. पाली जिल्ह्यात बिपरजॉय वादळामुळे मुसळधार पाऊस पडत आहे.
डझनहून अधिक धरणे ओव्हरफ्लो : पावसामुळे जावई धरणाचा विसर्गही ३२.४० फुटांवर पोहोचला आहे. बलवना, खिवंडी, सिंद्रू, जादरी, दुजाना, गलदेरा, तखतगड, दांतीवाडा, कोट, धानी, गुळाणा, साळी ही धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत. पाली जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर सुमेरपूर धोला राष्ट्रीय महामार्गावर पाणी आले आहे. अपघाताच्या शक्यतेबाबत प्रशासन सतर्क असून, वाहने थांबवण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी नमित मेहता स्वत: देखरेख करत आहेत.
जोधपूरमध्ये तीन फूट पाणी तुंबले : बिपरजॉय चक्रीवादळामुळे जोधपूर शहरात गेल्या अनेक तासांपासून पाऊस सुरू आहे. अनेक रस्त्यांना तलावाचे स्वरूप आले आहे. जोधपूरमध्ये 16 तासांहून अधिक काळ सतत पाऊस पडत आहे. अनेक प्रमुख रस्ते आणि वसाहतींमध्ये पाणी साचले आहे. महामंदिर रेल्वे स्थानकासमोरील रस्ता ३ फूट पाण्यात बुडाला. आज काही तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.