कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात भाजपा आणि तृणमूल काँग्रेसमध्ये अटीतटीचा सामना पाहायला मिळत आहे. सुरुवातीपासूनच भाजपानं मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात जोरदार मोहीम उघडलेली आहे. मात्र, ममता बॅनर्जी देखील भाजपाच्या प्रत्येक हल्ल्याला सडेतोड प्रत्युत्तर देत आहेत. अमित शहा यांच्या सांगण्यावरून मतदारांना सीआरपीएफच्या जवानांकडून त्रास दिला जात असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
चौथ्या टप्प्यासाठी 10 एप्रिल रोजी 44 जागांसाठी मतदान होणार आहे. निवडणूक सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, की मतदानादरम्यान सीआरपीएफचे जवान देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या आदेशानुसार मतदारांना त्रास देत आहेत.
यापूर्वीही दीदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सिंडिकेट क्रमांक 1, तर अमित शाह सिंडिकेट क्रमांक 2 आहेत, असे म्हटलं होते. अभिषेक, सुदीप आणि स्टालिन यांच्या मुलींच्या घरी केंद्रीय यंत्रणा पाठवल्या जात आहेत. तसेच भाजपा सलग पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करत आहेत, असे हावडामध्ये एका सभेला संबोधित करताना दीदी म्हणाल्या होत्या.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसला सत्तेतून खाली खेचण्यासाठी भाजपाने आपली सारी शक्ती पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये सलग सभा घेत आहेत. राज्यात भाजपाची सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. राज्यात 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानाचा पहिला टप्पा हा 27 मार्चला पार पडला. तर दुसरा टप्पा हा 1 एप्रिल, तिसरा टप्पा 6 एप्रिलाल पार पडला आहे. तर चौथा टप्पा 10 एप्रिल, पाचवा टप्पातील मतदान 17 एप्रिलला, तर सहावा टप्पा 22 एप्रिल, सातवा टप्पा 26 एप्रिलला आणि आठवा टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडेल.
हेही वाचा - मुकेश अंबानी सर्वात श्रीमंत भारतीय, वाचा पहिल्या दहामध्ये कोण-कोण?