सोनभद्र (उत्तर प्रदेश) : मध्य प्रदेशातील सिधी येथे एका व्यक्तीवर लघुशंका केल्याचा प्रकार ताजा असतानाच आता अशीच घटना उत्तर प्रदेशमधील सोनभद्र जिल्ह्यात घडली आहे. उत्तर प्रदेशातच काही दिवसांपूर्वी एका दलित तरुणाला मारहाण करून थुंकी चाटायला लावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. आता एका आदिवासी तरुणाच्या कानात लघुशंका केल्याचे प्रकरण समोर आले आहे. हा व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये अपशब्दांचाही वापर करण्यात आला आहे.
अपशब्दांचाही वापर : व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे. ओबरा पोलीस स्टेशन हद्दीतील घटीहाटा गावातील ही घटना मंगळवारी घडली होती. व्यक्तीक कारणावरून झालेल्या वादातून दुसऱ्या तरुणाने आदिवासी तरुणाच्या कानात लघुशंका करून शिवीगाळ केली. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर एसपी डॉ यशवीर सिंग, अतिरिक्त एसपी कालू सिंह, सीओ ओब्रा यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी पोहोचले होते.
मद्यप्राशन केल्यानंतर झाला वाद : या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले आहे. ही घटना 11 जुलैची आहे. जवाहीर पटेल आणि गुलाब कोल हे दोघेही एकमेकांच्या परिचयाचे आहेत. दोघांनी 11 जुलै रोजी मद्यप्राशन केले होते. त्यानंतर दोघांमध्ये वाद झाला होता. यानंतर जवाहीर पटेल याने पीडित गुलाब कोलच्या कानात लघुशंका केली. पण, दारूच्या नशेत असल्याने पीडितेला त्या दिवशी हा प्रकार लक्षात आला नाही. गुरुवारी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पीडितेला या घटनेची माहिती मिळाली. यानंतर पीडितेने पोलिसांत तक्रार दिली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली असल्याची माहिती एसपी डॉ यशवीर सिंह यांनी दिली आहे.
पीडित आणि आरोपी दोघेही एकमेकांना ओळखतात. 11 जुलै रोजी त्यांचे भांडण झाले आणि त्यानंतर आरोपीने पीडितेच्या कानात लघुशंका केली. त्यावेळी ते दोघेही नशेत होते. याप्रकरणी गुन्हा दाखळ करून अधिक तपास सुरू केला आहे - एसपी डॉ यशवीर सिंह
महिन्यातली दुसरी घटना : मध्य प्रदेशातील सिधी जिल्ह्यात एका दलित तरुणावर लघुशंका केल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर लगेच उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यात एका दलिताला मारहाण करून थुंकी चाटायला लावल्याची घटना समोर आली होती. त्यानंतर आता याच जिल्ह्यात आदिवासी तरुणाच्या कानात लघुशंका केल्याचा प्रकार समोर आला आहे.