धमतरी (छत्तीसगढ) Court of Bhangarao Mai : एखाद्यानं चूक केली तर त्याला कोर्टात शिक्षा होते, पण छत्तीसगडमध्ये एक असं कोर्ट आहे ज्यात चक्क देवी-देवतांनाही शिक्षा होते! हे विचित्र वाटेल, पण हे खरं आहे. ही शिक्षा देवी-देवतांचे न्यायाधीश देतात, ज्यांना 'भंगाराव माई' म्हटलं जातं. भंगाराव माईंच्या दरबारात देवी-देवतांना त्यांच्या चुकांची शिक्षा मिळते.
शेकडो वर्षांपासून परंपरा सुरू आहे : छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यातील आदिवासी समाजात ही परंपरा शेकडो वर्षांपासून सुरू आहे. भंगाराव देवीला मानणारे लोकं सांगतात की, आदिवासी समाजाच्या पारंपारिक परंपरेनुसार गावातील देवतांनाही स्वतःला निर्दोष सिद्ध करावं लागतं. त्यासाठी 'भंगाराव माईं'चं न्यायालय भरतं. सुनावणीनंतर इथे गुन्हेगाराला शिक्षाही होते. दरवर्षी भाद्रपद महिन्यात धमतरी जिल्ह्यातील कुर्सीघाट बोराई येथे आदिवासी देवतांच्या न्यायमूर्ती भंगाराव माईची जत्रा भरते. ज्यामध्ये परिसरातील देवी-देवता एकत्र येतात.
महिलांना जाण्यास मनाई आहे : या अनोख्या परंपरेचे साक्षीदार होण्यासाठी ९ सप्टेंबर रोजी हजारो लोक कुर्सीघाटावर पोहोचले. येथे ही जत्रा कुंवरपत आणि डाकदार यांच्या नेतृत्वाखाली विधीपूर्वक संपन्न झाली. कुर्सीघाटात भंगाराव माईंचा शतकानुशतके जुना दरबार आहे. हे देवी-देवतांचं न्यायालय म्हणून ओळखलं जातं. भंगाराव माईंच्या मान्यतेशिवाय या परिसरात कोणताही देव किंवा देवता कार्य करत नाही, अशी मान्यता आहे. विशेष म्हणजे, महिलांना या विशिष्ट न्यायालयाच्या ठिकाणी जाण्यास मनाई आहे.
देवी-देवतांना शिक्षा का : श्रद्धेपाई लोक देवी-देवतांची पूजा करतात, असं मानलं जातं. मात्र देवांनी आपलं कर्तव्य पार पाडलं नाही तर भंगाराव माईंच्या दरबारात त्यांना शिक्षा होते. सुनावणी दरम्यान, देवी-देवता कोर्टरूममध्ये उभे असतात. इथे भंगाराव माई न्यायाधीश म्हणून बसतात. गावातील कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा समस्या दूर करणे शक्य नसल्यास, गावातील स्थापित देवी-देवतांना जबाबदार मानलं जातं. सुनावणीनंतर येथे गुन्हेगाराला शिक्षा होते.
भंगाराव माईची कहाणी खूप आश्चर्यकारक आहे. ही माई बंग देशातून आली होती. त्यामुळे तिचं नाव 'भंगाराव' पडलं. या परिसरात देवी-देवतांशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या आहेत. त्यामुळे या न्यायालयाची स्थापना करण्यात आली आहे. - रामप्रसाद मरकाम, ग्रामीण
कारागृह बनवलं जातं : वर्षातून एकदा भरणाऱ्या भंगाराव जत्रेत गावकरी बकरी, कोंबड्या, भात, नारळाच्या फुलांसह देवी-देवतांच्या नावानं चिन्हांकित केलेली डोली घेऊन येतात. इथे वेगवेगळ्या गावातून आलेले दैत्य, देवीदेवता यांची एक-एक करून ओळख केली जाते. त्यानंतर डोलीसह आणलेली कोंबडी, बकरी एका खोल खंदकासारख्या खड्ड्यात टाकली जाते. ज्याला ग्रामीण कारागृह म्हणतात.
जशी कोर्टात गुन्हेगारांना शिक्षा होते, त्यांची चौकशी करून जबाब घेतला जातो, तसंच इथे प्रत्येक देवीची भंगारावकडून परीक्षा घेतली जाते. जर तिची चूक झाली असेल किंवा तिनं गावात सुरक्षा दिली नसेल तर त्याची शिक्षाही तिला मिळते. - मनोज साक्षी, ग्रामीण
शिक्षा कशी दिली जाते : पूजेनंतर देवी-देवतांवर झालेल्या आरोपांची सुनावणी सुरू होते. आरोपींच्या वतीने युक्तिवाद करण्यासाठी सिरहा, पुजारी, गायता, माळी, पटेल व गावचे प्रमुख उपस्थित असतात. दोन्ही पक्षांची सुनावणी झाल्यानंतर आरोप सिद्ध झाल्यास निकाल जाहीर होतो. दोषी आढळल्यास देवी-देवतांना शिक्षा होते.
या परंपरेच्या आकलनाबाबत आणि न्यायाच्या पद्धतीबाबत अनेक मतं असू शकतात. परंतु ज्या देवी-देवतांची मानव पूजा करतो त्यांनाही शिक्षा होत असेल तर ते नक्कीच वेगळं आहे. कुर्सीघाटमध्ये ही परंपरा फार पूर्वीपासून सुरू आहे. जिथे देवी-देवतांना काम नीट न केल्यामुळे शिक्षा भोगावी लागते!
हेही वाचा :