नवी दिल्ली Corona Update : भारतात एका दिवसात कोविडचे 702 रुग्ण आढळल्यानं खळबळ उडाली आहे. यासह, संसर्गाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 4 हजार 97 वर पोहोचली आहे. आरोग्य मंत्रालयानं गुरुवारी ही माहिती दिली. मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार 24 तासांच्या कालावधीत सहा नवीन रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यापैकी दोन जणांचा महाराष्ट्रात, तर कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगाल तसंच दिल्लीत एकाचा मृत्यू झालाय.
सुपरस्टार विजयकांत यांचं निधन : त्याचवेळी आज सकाळी साऊथ फिल्म इंडस्ट्रीतील सुपरस्टार विजयकांत यांचं निधन झालंय. त्यांचा मृत्यू कोरोनामुळं झाल्याचं सांगण्यात येत आहे. ते कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. विजयकांत हे देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (डीएमडीके) पक्षाचे संस्थापकही होते.
देशात JN.1 चे एकूण 109 रुग्ण : 26 डिसेंबर रोजी देशात उप-प्रकार JN.1 चे 40 रुग्ण नोंदवण्यात आले होते. त्यानंतर देशातील एकूण JN.1 रुग्णांची संख्या 109 झाली आहे. यामध्ये गुजरातमधील 36, कर्नाटकातील 34, गोव्यातील 14, महाराष्ट्रातील 9, केरळमधील 6, राजस्थान, तामिळनाडूमधील प्रत्येकी 4, तेलंगणातील 2 रुग्णांचा समावेश आहे. यातील बहुतांश रुग्णांवर घरीच उपचार सुरू असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितलंय.
5.3 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू : कोविडचा 2020 च्या सुरुवातीपासून जवळपास चार वर्षांत देशभरात 4.5 कोटींहून अधिक लोकांना संसर्ग झाला आहे. या कालावधीत 5.3 लाखांहून अधिक नागरिकांचा मृत्यू झालाय. मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, संसर्गातून बरे आलेल्या लोकांची संख्या 4.4 कोटींहून अधिक आहे. वेबसाइटनुसार, आतापर्यंत देशात कोविड लसींचे 220.67 कोटी डोस देण्यात आले आहेत.
हेही वाचा -