उडुपी ( कर्नाटक ) - कर्नाटकातील उडुपी जिल्ह्यात नथुराम गोडसेबाबत नवा वाद निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील करकला तालुक्यातील बोला गावात अज्ञाताने रस्त्याला नथुराम गोडसेचे नाव दिले. मिळालेल्या माहितीनुसार, हा फलक गावातील मुख्य रस्त्याच्या बाजूला दोन दिवसांपूर्वी म्हणजेच शनिवारी (दि. 4 जून) लावण्यात आला होता. मात्र, सोमवारी (दि. 6 जून) तो लोकांच्या लक्षात आला.
ज्या रस्त्यावर हा फलक लावण्यात आला होता. तो ग्रामपंचायत कार्यालयाच्या अगदी जवळचा आहे. त्यावर कन्नड लिपीत ‘पदुगिरी नथुराम गोडसे रस्ता’, असे लिहिले आहे. रस्त्यावर नथुराम गोडसेचे नाव असलेल्या फलकांची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर जोरदार टीका होत आहे. मात्र, ही बाब पंचायत विकास अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येताच तो फलक काढण्यात आला. पंचायत विकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला सांगितले की, रस्त्याच्या नामकरणाबाबत पंचायतीकडून कोणताही अधिकृत निर्णय घेण्यात आलेला नाही. हा फलक अज्ञात व्यक्तीने लावला होता. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली, त्यानंतर ती हटवण्यात आली.
हेही वाचा - Video : नियंत्रण सुटल्याने चारचाकीने तीन दुचाकींना उडवले, दुचाकीस्वाराचा मृत्यू