लखनौ (उत्तरप्रदेश): ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती विद्यापीठाच्या वसतिगृहात काही विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करत होते. वसतिगृहाचे वॉर्डन डॉ.आझम अन्सारी यांनी विद्यार्थ्यांना जयंती साजरी करण्यापासून रोखले. विद्यार्थ्यांनी वारंवार विनंती करूनही त्यांनी जयंती साजरी होऊ दिली नाही आणि परवानगी नसल्याचे सांगितले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्याला विरोध होत असलेला एक व्हिडिओही आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
वॉर्डनने केला जयंतीला विरोध: रविवारी काही विद्यार्थी विद्यापीठाच्या मुलांच्या वसतिगृहात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी जात होते. वसतिगृहातील एका ठिकाणी शिवाजी महाराजांचा फोटो ठेवून विद्यार्थी कार्यक्रमाला सुरुवात करणार होते. दरम्यान, याची माहिती मिळताच वसतिगृहाचे वॉर्डन तेथे पोहोचले आणि त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव थांबवला. ते म्हणाले की, 'इथे कार्यक्रम होणार नाही. तुम्ही असे कार्यक्रम अजिबात करू शकत नाही'.
हे अभ्यासाचे ठिकाण, जयंती विद्यापीठाबाहेर: विद्यार्थ्याने जयंती साजरी करण्याची वारंवार विनंती केली असता डॉ अन्सारी यांनी परवानगी घेतली आहे का, परवानगी मिळाली तर कार्यक्रम करा, असे सांगितले. यावर विद्यार्थ्याने 'सर परवानगी नाही' असे सांगितले. अन्सारी यांनी 'अजिबात जयंती साजरी करता येणार नाही, परवानगी मिळणार नाही. हे अभ्यासाचे ठिकाण आहे. तुम्हाला जयंती साजरी करायची असेल तर विद्यापीठाच्या बाहेर करा', असे सांगितले. विद्यार्थी म्हणाला, 'सर, जयंती आहे, आपण साजरी करू शकतो.' ते म्हणाले की, 'बाहेर एक मंडप टाकून तुम्ही साजरी करा. त्यांनी आम्हाला जयंती साजरी करू दिली नाही', असे विद्यार्थ्याने सांगितले. ईटीव्ही भारत व्हायरल झालेल्या व्हिडिओची पुष्टी करत नाही.
वसतिगृहातच जयंती साजरी : प्रॉक्टर डॉ. नीरज शुक्ला यांना याबाबत विचारले असता ते म्हणाले की, 'विद्यापीठाच्या नियमानुसार कोणत्याही कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांना परवानगी घ्यावी लागते. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करण्यासाठी येथील विद्यार्थ्यांनी कुठलीही अधिकृत परवानगी घेतली नव्हती. या कारणास्तव डॉ. आझम अन्सारी यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती कार्यक्रम आयोजित करण्यापासून थांबवले होते. जर विद्यार्थ्यांनी अगोदर परवानगी घेतली असती तर त्यांना अडवण्यात आले नसते. नंतर परवानगी दिल्यानंतर आमच्या उपस्थितीत छत्रपती शिवरायांच्या जयंतीचा कार्यक्रम पार पडला, असेही ते म्हणाले.