नवी दिल्ली - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्या होत्या. हा मुद्दा काँग्रेस खासदार कुमार केतकर यांनी आज लोकसभेत उपस्थित केला. मनसुख हिरेन आणि मोहन डेलकर मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
कुमार केतकर यांनी दादरा आणि नगर हवेलीचे खासदार मोहन डेलकर यांच्या आत्महत्येचे प्रकरणही लोकसभेत उपस्थित केले. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर आढळलेल्या स्कॉर्पिओ गाडी प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एनआयए) या प्रकरणाची चौकशी करत आहे. मात्र, जिलेटिन कोणी पुरवले, याबाबत तपास करण्यात आलेला नाही, असे केतकर म्हणाले.
काय आहे प्रकरण?
मुकेश अंबानींच्या घरासमोर स्फोटके सापडल्याप्रकरणी आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेंना एनआयएने अटक केली आहे. वाझेंना न्यायालयाने २५ मार्चपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 24 फेब्रुवारीच्या रात्री एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ ठेवण्यात आली. याप्रकरणाचा तपास पोलीस अधिकारी सचिन वाझे करत होते. यादरम्यान, मुख्य साक्षीदार मनसुख हिरेन यांचा संशयास्पद मृत्यू झाला. याप्रकरणी तपास अधिकारी सचिन वाझे वादात सापडले होते.
हेही वाचा - रिप्ड जीन्स विधानावर महिला नेत्यांचा तीरथसिंह रावत यांच्यावर हल्लाबोल