बेंगळुरू Godhra Like Incident : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी के हरिप्रसाद यांनी एक असं वक्तव्य केलं, ज्यामुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यांचं हे वक्तव्य, अयोध्या यात्रेसंदर्भात आलं आहे.
कर्नाटकात गोध्रासारखी घटना घडण्याची भीती : कर्नाटकातील भाविक मोठ्या संख्येनं अयोध्येला जाण्याच्या तयारीत आहेत. हे सर्वजण राम मंदिराच्या दर्शनासाठी अयोध्येला जाणार आहेत. यावर बी के हरी प्रसाद म्हणाले की, कर्नाटकात गोध्रासारखी घटना घडण्याची भीती आहे. कर्नाटकातून अयोध्येला जाणार्या भाविकांच्या सुरक्षेची खात्री कोण घेणार? मला गोध्रामध्ये घडलेल्या प्रकाराप्रमाणे काही अप्रिय घटना घडण्याची भीती आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेसचं स्पष्टीकरण : त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण झाल्यानंतर काँग्रेसनं स्पष्टीकरण दिलंय. त्यांचं हे विधान वैयक्तिक असून, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असं काँग्रेसच्या एका नेत्यानं सांगितलं. बी के हरिप्रसाद यांच्या वक्तव्यावर भाजपानं तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यासह त्यांच्या अटकेची मागणी पक्षानं केली. हरिप्रसाद यांच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करण्यात यावा. गुन्हा दाखल न झाल्यास मी स्वतः पोलिसात जाऊन तक्रार करणार, असं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री डी व्ही सदानंद गौड म्हणाले.
भाजपाकडून तीव्र निषेध : म्हैसूरमधील भाजपाचे आणखी एक नेते टीएस श्रीवत्स यांनी बी के हरिप्रसाद यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आम्हाला (हिंदूंना) कोणी स्पर्श करून दाखवावा, असं आव्हान त्यांनी दिलं. काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आलं. तरी तिथे कोणी एक दगडही फेकला नाही. कारण केंद्रात मोदी सरकार आहे, असं ते म्हणाले. त्यांचं केवळ नावच 'हरी' आहे. अन्यथा त्यांचा देवाशी काहीही संबंध नाही. अशी टीका श्रीवत्स यांनी केली.
काही अप्रिय घडल्यास हरिप्रसाद जबाबदार : त्यांच्या वक्तव्यावर रामभक्त गप्प बसणार नाहीत. ते मैदानात उतरले तर काँग्रेस त्यांच्याशी स्पर्धा करू शकणार नाही, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री केएस ईश्वरप्पा म्हणाले. 22 जानेवारीला कोणतीही घटना घडल्यास त्याला थेट हरिप्रसाद जबाबदार असतील, असंही ईश्वरप्पा म्हणाले. अयोध्येतील कार्यक्रम हा धार्मिक कार्यक्रम नसून तो राजकीय कार्यक्रम असल्याचं हरिप्रसाद यापूर्वी म्हणाले होते.
हे वाचलंत का :