नवी दिल्ली : लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांना सभापती ओम बिर्ला यांनी १० ऑगस्ट रोजी संसदेत गैरवर्तन केल्याबद्दल निलंबित केले आहे. शनिवारी त्यांना या प्रकरणी विशेषाधिकार समितीला सामोरे जावे लागेल. त्यापूर्वी बोलताना त्यांनी स्वतःचा बचाव केला. 'माझ्यासाठी कायदेशीर मार्गाचा पर्याय खुला आहे', असे ते म्हणाले.
मी असंसदीय काहीही बोललो नाही : 'मी असंसदीय असे काहीही बोललो नाही. 'नीरव' या हिंदी शब्दाचा वापर लोक रोजच्या संभाषणात करतात. ते छोट्या गोष्टीला विनाकारण मोठे करण्याचा प्रयत्न करत आहेत', असे चौधरी यांनी ईटीव्ही भारतला सांगितले. 'मी अध्यक्षांच्या निर्णयावर भाष्य करू इच्छित नाही, कारण ते सभागृहाचे संरक्षक आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा कायदेशीर पर्याय आमच्यासमोर खुला आहे', असे त्यांनी स्पष्ट केले.
हे प्रतिगामी पाऊल आहे : 'हे एक प्रतिगामी पाऊल आहे. यामुळे संसदीय लोकशाहीच्या भावनेला तडा जाईल. संसदेत एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे', असे अधीर रंजन चौधरी म्हणाले. 'आम्ही पक्ष म्हणून नियमांचे पालन करतो. मी पण नियम पाळेन. जर त्यांनी मला बोलावले तर मी निश्चितपणे समितीसमोर हजर होईन, असे चौधरी यांनी म्हटले आहे.
मी माफी का मागावी : 'सरकारमधील एक मंत्री मी सभागृहात केलेल्या कथित टिप्पणीबद्दल माफीची मागणी करत आहे. पण मी का माफी मागावी? मी सभागृहात बोलत असताना मला माफी मागा असे कोणीही सांगितले नाही. मला माझे भाषण पूर्ण करू दिले असते तर मी माझे म्हणणे स्पष्ट केले असते. हे मंत्री सूडबुद्धीने मला माफी मागण्यास लावत आहेत, असे ते म्हणाले.
..म्हणून आम्ही वॉकआऊट केला : अधीर रंजन चौधरी यांनी यावेळी विरोधकांचा सभागृहातून वॉकआऊटचा बचाव केला. 'पंतप्रधान मणिपूरच्या मुद्द्यावर बोलतील असे आम्हाला वाटले, कारण तेच अविश्वास प्रस्तावाचे मुख्य कारण होते. पंतप्रधान सभागृहात येत नसल्याने विरोधकांना तो प्रस्ताव आणावा लागला. ते सभागृहातील नेते आहेत आणि तेथे भाजपचे बहुमत आहे. आम्ही दोन तास पंतप्रधानांचे म्हणणे ऐकले, मात्र त्यात मणिपूरचा उल्लेख नव्हता. म्हणून आम्ही त्याच्या निषेधार्थ बाहेर पडलो, असे चौधरी म्हणाले. तसेच पंतप्रधानांना 'इंडिया' हा शब्द आवडत नाही. हे त्यांना अस्वस्थ करते, अशी टीकाही त्यांनी केली.
हेही वाचा :