नवी दिल्ली - पुढील वर्षात उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय घडमोडींनी वेग घेतला. माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद काँग्रेसला रामराम ठोकत भाजपवासी झाले. पियुष गोयल यांच्या उपस्थितीत त्यांनी आज भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
उत्तर प्रदेशातील 2017 विधानसभा निवडणुकीनंतर जितिन प्रसाद भाजपात जाणार अशी चर्चा सुरू होती. तसेच 2019 लोकसभा निवडणुकीनंतरही या चर्चेला उधाण आले होते. प्रियंका गांधी यांनी त्यांची समजूत काढल्यानंतर भाजपात जाण्याचा निर्णय रद्द केल्याचे बोलले जात होते. मात्र, आज अखेर त्यांनी भाजपात प्रवेश केला. 2019 मध्ये दुर्लक्ष करून उत्तर प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अजय कुमार लल्लू यांना करण्यात आले होते.
कोण आहेत जितिन प्रसाद?
दिग्गज नेते दिवंगत जितेंद्र प्रसाद यांचे जितीन प्रसाद हे पुत्र आहेत. राजीव गांधी आणि पी.व्ही. नरसिंह राव या दोन माजी पंतप्रधानांचे राजकीय सल्लागार म्हणून नेते दिवंगत जितेंद्र प्रसाद यांनी काम केले होते. जितीन प्रसाद यांचे वडील जितेंद्र प्रसाद यांनी 2000 मध्ये सोनिया गांधींविरोधात काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. मात्र, त्यात त्यांचा पराभव झाला होता. 2001 मध्ये जितेंद्र प्रसाद यांचा मृत्यू झाला होता. तर 2001 मध्ये जितिन प्रसाद युवक काँग्रेसशी जोडले गेले. शाहजहाँपूरमधून 2004 लोकसभा निवडणूक जिंकली होती. काँग्रेस सरकारमध्ये त्यांनी मंत्रीपदही भूषवली आहेत.