नवी दिल्ली - उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका वाढला असून नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. राजधानी दिल्लीत या वर्षीच्या सर्वात कमी तापमानाची नोंद झाली आहे. गुरुवार दिल्लीसाठी सर्वात जास्त कडाक्याचा राहिला. थंडीमुळे उत्तरप्रदेश, हरयाणा, पंजाब, हिमाचल प्रदेशसह दिल्लीत सकाळच्या वेळी रस्त्यांवर तुरळक गर्दी दिसून येत आहे. काश्मिर, हिमाचल प्रदेशातील डोंगराळ हिमालयीन भागात काही ठिकाणी बर्फवृष्टीही झाली.
दहा अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यानंतर हवामान विभागकडून 'शीत लहर' म्हणजेच थंडीची लाट आल्याचे जाहीर करण्यात येते. यासोबतच उत्तर प्रदेश, बिहार, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यांच्यासह पहाडी जिल्ह्यातही तापमान कमी झाले आहे. पंजाब आणि हरयाणा राज्याची संयुक्त राजधानी चंदीगढमध्ये मागील काही दिवसांपासून तामपान ५.१ डिग्री सेल्सिअस झाले आहे. हरयाणातील विविध जिल्ह्यात तापमान ४ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. सध्या दिल्लीमध्ये केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू असून शेतकरी कडाक्याच्या थंडीत रस्त्यांवर झोपत आहेत. काही शेतकऱ्यांचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यूही झाला आहे.
काश्मिरात बर्फवृष्टी होण्याची शक्यता -
डिसेंबर महिन्याच्या शेवटी काश्मिरात मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. २१ किंवा २२ डिसेंबरला काश्मिरातील विविध ठिकाणी बर्फवृष्टी होणार असल्याचेही म्हटले आहे. उत्तर प्रदेशातील काही भागात हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. तर बाकी ठिकाणी कोरडे आणि थंड हवामान राहिले. गोरखपूर जिल्ह्यात ३.३ डिग्री सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले आहे.
राजस्थानातही पारा घसरला
राजस्थानातील माऊंट अबू परिसरात किमान तापमान १ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. सीकर जिल्ह्यात किमान तापमान ०.५ डिग्री झाले आहे. चुरू, पिलानी, गंगानगर, बिकानेर, फलौदी आणि वनस्थली या जिल्ह्यातीलही पारा घसरला आहे.