नवी दिल्ली - उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना फाटलेल्या जीन्सवरील विधान त्यांना चांगलंच भोवलं आहे. त्यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठली आहे. यातच रावत यांच्या पत्नी डॉ. राश्मि त्यागी बचावसाठी धावल्या असून रावत यांच्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री आपल्या सांस्कृतिक वारशाबद्दल बोलत होते. आपल्या वेशभूषा व नीतिमत्तेबद्दल आपण भारतात नाही, तर मग विदेशात बोलणार का, असा सवाल रश्मी यांनी केला. सामान्य आणि मध्यमवर्गीय व्यक्ती आपला सांस्कृतिक वारसा जतन करण्यास सक्षम आहे. जे लोक संस्कृतीचे विध्वंस करीत आहेत. ते उच्चभ्रू वर्गातील आहेत, असेही त्या म्हणाल्या.
उत्तराखंडमध्ये बर्याच प्रकारच्या समस्या आहेत. ज्या आपण विचारात घेतल्या पाहिजेत. जर आपण अशा वादात अडकलो. तर मग राज्याचा विकास कसा होईल. इतर समस्यांसमोर जीन्स इतका मोठा मुद्दा आहे का, असाही सवाल त्यांनी केला. हे राजकीय लोकांचे षड्यंत्र आहे. मुख्यमंत्र्यांच्या कार्यशैलीवर याचा परिणाम होणार नाही. ते राज्याच्या विकासासाठी काम करत राहतील, असेही त्या म्हणाल्या.
काय म्हणाले होते तिरथसिंह रावत?
उत्तराखंडचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी नवा वाद ओढावून घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भगवान रामशी तुलना केल्यानंतर आता महिलांनी जीन्स घालण्याबाबत त्यांनी वादग्रस्त विधान केले आहे. आजकाल महिला फाटलेली जीन्स घालतात, हे कसले संस्कार आहेत? या महिला आपल्या मुलांना काय संस्कार देतील, असे विधान त्यांनी केले आहे. बाल हक्क संरक्षण आयोगाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. मुले-मुली फाटलेली जीन्स घालतात. या प्रकारचे वातावरण योग्य नाही. हे ब्रिटिशांचे अनुसरन करत आहेत. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या, ज्या मुलाला संस्कार आहे. तो कधीही अपयशी ठरू शकत नाही, असे ते म्हणाले. त्यांचे विधान वादात पडताना दिसत आहे. त्यांच्या या वक्तव्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.
बीजेपी हायकमांडकडून रावत यांची चौकशी -
महिलांच्या फाटक्या जीन्स मुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांना भाजप हायकमांडकडून चौकशीसाठी दिल्लीत बोलाविण्यात आले आहे. या प्रकरणाबद्दल भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा हे रावत यांची चौकशी करणार आहेत.