राज्यामध्ये शिंदे सरकार सत्तारुढ झाल्यानंतर आता मंत्रीमंडळ विस्ताराबाबत विचारविमर्श सुरू झाले आहेत. भारतीय जनता पार्टीने शिवसेनेतील बंडखोर गटाला पाठिंबा देत राज्यामध्ये सत्ता स्थापन केली आहे. त्यानंतर मंत्रीमंडळ रचनेबाबत चर्चेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शुक्रवारी भेट घेतली. एकनाथ शिंदे यांच्या गटाला 13-15 मंत्रीपदे मिळण्याची शक्यता असल्याचे सुत्रांचे म्हणणे आहे. शिंदे-फडणवीस दोन दिवसांच्या दिल्लीतील मुक्कामात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेट घेणार आहेत.
मंत्रीमंडळ वाटपाबाबत चर्चा - एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचे 40 आमदार सोबत घेत शिवसेनेला मोठे खिंडार पाडले. या धक्क्याने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. उद्धव ठाकरे यांना राजीनामा द्यावा लागला आणि त्यानंतर लगेचच एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. लगोलग शिंदे सरकारने बहुमत चाचणीही पार पाडली. राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघे शुक्रवार, शनिवार असे दोन दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. शुक्रवारी या दोन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीत शिंदे सरकारच्या मंत्रीमंडळ रचनेबाबत चर्चा झाल्याचे कळते. 50 आमदार असलेल्या शिंदे गटाच्या वाटेला 13 ते 15 मंत्रीपदे जाण्याची शक्यता आहे.
आठ कॅबिनेट मंत्री - राज्यमत्री मंत्रीमंडळामध्ये एकूण 43 मंत्रीपदे दिली जाण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पार्टीकडे 120 आमदारांचे पाठबळ असल्याने मोठा गट म्हणून भाजपच्या वाटेला मंत्रीपदांची संख्या जास्त असणार आहे. दिल्लीत अमित शहांची भेट घेतलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या गटाला 13-15 मंत्रीपदे मिळण्याबाबत प्रस्ताव दिल्याचे समजते. त्यामध्ये 8 कॅबिनेट मंत्रीपदे असू शकतील. उर्वरित मंत्रीपदे भाजपकडे जातील. मंत्रीमंडळ रचनेबाबत प्राथमिक चर्चा झाली असून लवकरच त्याला अंतिम स्वरुप दिले जाईल.
पंतप्रधानांचीही भेट घेणार - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दोन दिवस दिल्लीत मुक्काम आहे. आज (शनिवार) ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही ते भेट घेतली. दुपारी त्यांची राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू भेट होईल. त्यानंतर विशेष विमानाने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मुंबईला परत येतील.
सदिच्छा भेटीसाठी दिल्ली दौरा - मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपण दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि नड्डा यांची सदिच्छा भेट घेण्यासाठी आलो आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रीमंडळासंदर्भात सर्वांना लवकरच माहिती मिळेल, असे ते म्हणाले. तर आमच्याकडे दोन तृतीअंश आमदार असल्याने आम्ही विधिमंडळाच्या नियमानुसार कारवाई केल्याचे त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण असून तिथेही आम्हाला न्याया मिळेल, असे विश्वास त्यांनी व्यक्त केला.