हैदराबाद - येथील भारत बायोटेकच्या कॅम्पसला केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून (सीआयएसएफ) सुरक्षा पुरविली जाणार आहे. शमिरपेट परिसरातील जिनोम व्हॅलीस्थित नोंदणी कार्यालय आणि उत्पादन प्लांट येथे ही सुरक्षा पुरविली जाणार आहे. सुरक्षा दलाचे 64 जवान येथे तैनात केले जाणार आहेत. निरीक्षक स्तरावरच्या अधिकाऱ्यांकडून सीआयएस टीमचे नेतृत्व केले जाणार आहे. 14 जूनपासून ही सुरक्षा पुरविण्यात येणार आहे, अशी माहिती सीआयएसचे उपमहानिरीक्षक आणि मुख्य प्रवक्ते अनिल पांडे यांनी माध्यमांना दिली.
दहशतवादी हल्ल्याचा धोका -
केंद्रीय गृह मंत्रालयाकडून नुकतेच भारत बायोटेकला सीआयएसएफ सुरक्षा पुरविण्यासंदर्भात मंजूरी देण्यात आली आहे. माहितीनुसार, वैद्यकीय आणि आरोग्य सुरक्षितेच्या दृष्टीने भारत बायोटेक ही देशातील एक महत्त्वाची संस्था आहे आणि या संस्थेला दहशतवादाचा धोका दर्शविला जात आहे. या पार्श्वभूमीवर, हैदराबादमधील भारत बायोटेकच्या कॅम्पसला सीआयएसएफची सुरक्षा पुरविली जाणार आहे.
हेही वाचा - जबलपूरमध्ये आहे जगातील सर्वात महाग आंबा; तब्बल दोन लाख रुपये किंमत
लसीच्या उत्पादनाला गती देणार -
भारत बायोटेकने कोरोनावरील कोव्हॅक्सिन ही लस उपलब्ध करुन दिली आहे. भारतात कोरोनावरील दोन स्वदेशी लसची निर्मिती करण्यात आली आहे. त्यातील एक भारत बायोटेकने उपलब्ध करुन दिली आहे. देशातील लसीकरणाची गरज लक्षात घेता भारत बायोटेककडून या लसीचे उत्पादनाला गती देण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
2008मध्ये झालेल्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर सीआयएसएफला सार्वजनिक महत्त्व असलेल्या खासगी संस्थांना सुरक्षित ठेवण्याची परवानगी देण्यात आली होती. सीआयएसकडून देशातील 10 महत्त्वाच्या ठिकाणी सुरक्षा पुरविण्यात आहे. यात पुण्यातील आणि म्हैसूर येथील इम्फोसिस कंपनी, नवी मुंबईतील रिलायंस आयटी पार्क आणि योगगुरु रामदेव यांच्या उत्तराखंडच्या हरिद्वार येथील कपंनीचा समावेश आहे.