चित्तूर (आंध्रप्रदेश) - मुलींच्या दुहेरी हत्येतील आरोपी म्हणजेच त्यांच्या वडिलांनी हत्याकांडाविषयीचा धक्कादायक खुलासा केला आहे. मोठ्या मुलीचा खून केल्यानंतर तिच्या आईने मुलीची जीभ खाल्ल्याचे त्यांनी सांगितले आहे. येथील मदनपल्ली शहरात अंधश्रद्धेवर विश्वास ठेवून सुशिक्षित आई-वडिलांनी आपल्या दोन मुलींची हत्या केल्याची घटना काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यानंतर आता हा धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अलेख्या (वय 27 वर्षे) आणि साई दिव्या (वय 22) अशी आई-वडिलांच्या विकृतीची शिकार ठरलेल्या या दोन मुलींची नावे आहेत. हे कुटुंब मदनपल्ली येथील शिवालयम मंदिर रस्त्यावर राहत होते.
स्वतःला कालिका समजणारी माझी पत्नी पद्मजा हिने आमच्या मोठ्या मुलीला ठार मारल्यानंतर तिची जीभ कापली आणि खाल्ली, असे आरोपी वडील पुरुषोत्तम नायडू यांनी पोलिसांना सांगितले. मोठी मुलगी अलेख्या स्व:ताला अर्जुनाचा एक प्रकार मानत होती, असेही ते म्हणाले. यावरून मुलींवरदेखील अंधश्रद्धांचा पगडा होता, असे निदर्शनास येत आहे. महाविद्यालयात शिकवणे तुमचे काम नव्हे. पांडवांचे नेतृत्व करताना अर्जुनाने ज्या प्रकारे लढाई केली होती, तशी लढाऊ भावना तुम्ही ठेवली पाहिजेत, असे अलेख्या मला सांगायची, असेही ते म्हणाले. कलियुगाचा अंत आता जवळ आला असून लवकरच सत्ययुग सुरू होणार आहे आणि कोरोना महामारी हा त्याचा एक इशारा असल्याचेही अलेख्या म्हणायची असे त्यांनी सांगितले.
आई आयआयटी सुवर्णपदक विजेती, वडील महाविद्यालयात प्राचार्य
दरम्यान, घटना घडली त्यावेळी या आई-वडिलांना मुलींची हत्या केल्याबद्दल जराही दुख: वाटत नव्हते. त्यांनी मुलींचा खून का केला? असे विचारले असता, आता कलियुग संपत आले आहे, सोमवारपासून सत्ययुग सुरू होईल. सत्ययुगाचा सूर्य उगवल्यानंतर दोन्ही मुली पुन्हा जिवंत होतील, असे सांगितले. आई-वडील दोघे उच्च शिक्षित असून आई पद्मजा आयआयटी सुवर्णपदक विजेती असून मदनपल्ली भागात आयआयटीचे वर्ग घेतात आणि वडील एका महाविद्यालयात प्रचार्य आहेत. दोघेही उच्च शिक्षित असूनही हा प्रकार घडल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.