बीजिंग : गतवर्षी गलवान खोऱ्यात सीमेनजिक भारतीय सैन्यासोबत झालेल्या धुमश्चक्रीत आपले पाच सैन्य अधिकारी आणि जवान मारले गेल्याची कबुली चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने दिली आहे. चीनने प्रथमच गलवान खोऱ्यातील तणावात आपले सैनिक ठार झाल्याची कबुली दिली आहे.
चीनी सैन्यदलाच्या वृत्तपत्राकडून माहिती जारी
गेल्यावर्षीच्या जूनमध्ये गलवान खोऱ्यात सीमेनजिक भारत आणि चीनी सैनिकांमध्ये धुमश्चक्री झाली होती. यात काराकोरममध्ये तैनात असलेले पाच अधिकारी आणि जवान ठार झाल्याचे चीनच्या केंद्रीय लष्करी आयोगाने सांगितल्याचे वृत्त चीनी सैन्याच्या अधिकृत वृत्तपत्रात शुक्रवारी प्रकाशित झाले आहे.
ठार सैनिकांची माहितीही दिली
ठार झालेल्यांमध्ये पीएलए शिन्जियांग लष्करी कमांडचे रेजिमेंटल कमांडर क्वि फाबाओ यांचा समावेश असल्याचे ग्लोबल टाईम्सने म्हटले आहे. क्वि फाबाओ यांना केंद्रीय सैन्य आयोगाने हिरो रेजिमेंटल कमांडर या मरणोत्तर सन्मानाने गौरविले आहे. तर चेन होन्जुंग यांना हिरो टु डिफेंड द बॉर्डर आणि चेन शियान्ग्रॉन्ग, शियाओ सियुआन आणि वांग झुओरान यांना फर्स्ट क्लास मेरीट सन्मानाने गौरविले आहे.
भारताचे 20 जवान शहीद
15 जून 2020 रोजी गलवान खोऱ्यात झालेल्या धुमश्चक्रीत भारतीय सैन्यदलाचे 20 जवान शहीद झाले होते. भारत-चीन सैन्यादरम्यानचा गेल्या चार दशकांतील हा सर्वात हिंसक तणाव असल्याचे यानंतर सांगितले गेले. भारताने या घटनेनंतर लगेचच आपले सैनिक शहीद झाल्याची माहिती जारी केली होती. मात्र चीनने अजूनपर्यंत याविषयी कसलिही अधिकृत माहिती जारी केलेली नव्हती. मात्र आता प्रथमच चीनने आपले जवान ठार झाल्याची कबुली देत जवानांची माहितीही सार्वजनिक केली आहे. दरम्यान, 10 फेब्रुवारी रोजी प्रकाशित केलेल्या एका वृत्तात रशियन वृत्तसंस्था टासने गलवान खोऱ्यातील धुमश्चक्रीत चीनचे 45 जवान ठार झाल्याचे म्हटले होते.