नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये शनिवारी झालेल्या नक्षलवादी विरोधी कारवाईमध्ये देशाच्या २२ जवानांना वीरमरण प्राप्त झाले. या एकूणच शोधमोहिमेचे नियोजन ढिसाळ होते, त्यामुळेच आपल्या एवढ्या जवानांना हौतात्म्य पत्करावे लागले, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
सीआरपीएफचे महासंचालक कुलदीप सिंह म्हणाले होते, की या संपूर्ण ऑपरेशनमध्ये गुप्तचर यंत्रणा वा जवान कुठेही कमी पडले नाहीत. गुप्तचर यंत्रणेने दिलेली माहिती योग्य होती म्हणूनच हे ऑपरेशन इतक्या पुढे गेले. तसेच, आपले जवानही शिताफीने लढले, आपले जवान कमी पडले असते, तर एकही नक्षलवादी ठार झाला नसता. मात्र, जेवढे नक्षलवादी ठार झाले, तेवढेच जर आपले जवानही हुतात्मा होत असतील, तर या ऑपरेशनला 'यशस्वी' कसे म्हणता येईल? असा प्रश्न राहुल गांधींनी उपस्थित केला आहे.
दरम्यान, या चकमकीत सुमारे ३१ जवान जखमीही झाले होते. तसेच, सीआरपीएफचे एक निरीक्षक अजूनही बेपत्ता आहेत. हे ऑपरेशन सुरू असताना सुमारे ४०० नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांच्या एका तुकडीला घेराव घालत त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला होता, असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा : बीजापूर चकमक : चारशे नक्षलवाद्यांनी दीड हजार जवानांना घेरुन केला हल्ला; अधिकाऱ्यांची माहिती
हेही वाचा : बीजापूर चकमक : अमित शाह आज छत्तीसगडमध्ये; जखमी जवानांची घेणार भेट