नवी दिल्ली - 'बाबा का ढाबा' पुन्हा चर्चेत आला आहे. 'बाबा का ढाबा'चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येच्या प्रयत्न केला होता. दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. यातच दिल्ली पोलिसांनी फूड ब्लॉगर गौरव वासनसंदर्भात मोठा खुलासा केला आहे. कांता प्रसाद यांच्यासाठी लोकांनी आर्थिक मदत केली होती. यात गौरवने साडेचार लाख रुपयांची हेराफेरी केली होती, असे दिल्ली पोलिसांनी सांगितले आहे. पोलीस येत्या काही दिवसांत वासनविरूद्ध आरोपपत्र दाखल करु शकतात.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये फूड ब्लॉगर गौरव वासनने कांता प्रसाद यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला होता. व्हिडिओमध्ये कांता प्रसाद रडताना दिसत होते. हा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता. त्यानंतर हा ढाबा चालवणाऱ्या दोन वयोवृद्ध कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवीची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोकांनी मदतीचा हात पुढे केला. यावेळी गौरवने लोकांकडून येणारी आर्थिक मदत जमा होण्यासाठी आपला आणि पत्नीचा खाते क्रमांक दिला होता. मोठ्या संख्येने लोकांनी मदतीसाठी दोन्ही बँक खात्यावर पैसे पाठवले होते. ही रक्कम चार लाख रुपयांपेक्षा जास्त होती. रक्कम बँक खात्यात आल्यानंतर गौरवने ती बाबांना दिली नाही. मदतीसाठी मिळालेल्या देणगीच्या रक्कमेत त्याने हेराफेरी केली होती.
गौरवने पैशाची हेराफेरी केल्याचा संशय आल्यानंतर गौरव वानसविरोधात कांता प्रसाद यांनी एफआयआर दाखल केला होता. तेव्हा गौरवने कांता प्रसाद यांना देणगीतून जमा झालेले साडेचार लाख रुपये दिले होते. यामुळे पोलिसांनी त्याला अटक केली नाही. याप्रकरणी गौरवने पोलिसांनी कांता प्रसाद यांच्याशी बोलणी झाल्याची माहिती दिली होती. मात्र, कांता प्रसाद यांनी नकार देत खटला सुरु ठेवण्यास सांगितले होते. गौरवने पैसे परत केले असले तरी त्याने चूक केली. त्यामुळे आरोपपत्र दाखल केले जात आहे. त्याच्याविरूद्ध कारवाई होईल की नाही यावर न्यायालय पुढील निर्णय घेईल.
आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल...
दिल्लीमधील 'बाबा का ढाबा' हा ढाबा काही दिवसांपूर्वी कोणाला माहितही नव्हता. लॉकडाऊनमुळे तिथे कोणी जात नव्हते, ज्यामुळे हा ढाबा चालवत असलेले दाम्पत्य अडचणीत आले होते. मात्र, या ढाब्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता याठिकाणी लोकांच्या रांगा लागल्या. या ढाब्याचे मालक कांता प्रसाद यांच्या व्यथा ऐकून, पाहून बऱ्याच जणांनी मोठ्या प्रमाणात मदत केली. या मदतीतून त्यांनी ढाबा बंद करत नवे रेस्टॉरंट सुरू केले होते. मात्र, लॉकडाऊनमुळे रेस्टॉरंट तोट्यात गेल्याने कांता प्रसाद यांना ते बंद करावे लागले. त्यांनी रेस्टॉरंट बंद करुन आपल्या जुन्या जागेतच व्यवसाय सुरु केला आहे. मात्र, आर्थिक अडचणी सुटत नसल्याने त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. कांता प्रसाद यांनी दारू पिल्यानंतर झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या.
हेही वाचा - कांता प्रसाद आणि गौरव वासन यांच्यात का झाला होता वाद, मुलाने केला खुलासा