बंगळुरू (कर्नाटक) : 'चंद्रयान 3' मोहिमेच्या यशानंतर भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी 'आदित्य एल1' सौर मोहीम हाती घेत आहे. येत्या आठवडाभरात आदित्य एल १ यान सुर्याच्या दिशेनं झेपवण्याची शक्यता आहे. त्यासाठी इस्त्रो तयारी करत आहे. 'आदित्य एल १' मिशन 2 सप्टेंबरला पाठवलं जाण्याची शक्यता आहे. (Aditya L 1 Mission) (Chandrayaan 3 Mission)
'इस्रो'ची सूर्यावर पहिलीच मोहीम : सूर्याचा अभ्यास करण्याची 'इस्रो'ची ही पहिलीच मोहीम आहे. हे यान पृथ्वीपासून 15 लाख किलोमीटर अंतरावर असलेल्या 'लॅग्रेंज पॉइंट एकवर नेण्यात येणार आहे. या ठिकाणाहून ग्रहण किंवा कोणत्याही अडथळ्याशिवाय सूर्याचं निरीक्षण करता येतं. या स्थानावरून सूर्यावरील घटना काही सेकंदात पाहता येणार आहेत. या अंतराळयानावर सात उपकरणं असून, त्याद्वारे विविध निरीक्षणं नोंदवली जाणार आहेत.
'आदित्य एल1' मोहिमेचा उद्देश : आदित्य L1 सूर्याच्या प्रकाशमंडलातील चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करणार आहे. इस्रोने दिलेल्या महितीनुसार, आदित्य L1 क्रोमोस्फियर, गतिशीलता, सूर्याचं तापमान, कोरोनाचे तापमान, कोरोनल मास इजेक्शन आदीचा अभ्यास करणार आहे. सूर्यापासून उष्णता उत्सर्जित होण्यापूर्वीचा अभ्यास आदित्य L1 करणार आहे. अवकाशातील हवामान, इतर वैज्ञानिक बाबींचाही या मोहिमेत अभ्यास केला जाणार आहे.
मोहिमेची सर्व तयारी पूर्ण : मिशन 'आदित्य'बद्दल 'इस्रो'चे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं की, "भारताची ही सूर्याकडे जाणारी पहिली मोहीम आहे. या मोहिमेच्या माध्यमातून भारत सूर्याचा अभ्यास करणार. हे यान सप्टेंबरच्या सुरुवातीला प्रक्षेपित केलं जाईल. या मोहिमेची सर्व तयारी पूर्ण झाली. आदित्य एल 1 हे यान सतीश धवन अंतराळ केंद्रतून प्रक्षेपित केलं जाईल. इस्रो पुढील पाच वर्षे या मोहिमेद्वारे सूर्याचा अभ्यास करेल.
चुंबकीय क्षेत्राबद्दल माहिती : आदित्य एल1 हे यान पूर्णपणे स्वदेशी आहे. बंगळुरूमधील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रोफिजिक्स (IIA) या संस्थेचं पेलोड्स निर्मितीसाठी महत्वाचे योगदान आहे. तसेच इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर ॲस्ट्रॉनॉमी अँड ॲस्ट्रोफिजिक्स, पुणे यांनी या मिशनसाठी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजर पेलोड विकसित केलं आहे. आदित्य L1 अल्ट्राव्हायोलेट पेलोड वापरून फ्लेअर्सचं निरीक्षण करून कोरोना, सौर क्रोमोस्फियरची माहिती देऊ शकतं. पार्टिकल डिटेक्टर, मॅग्नेटोमीटर पेलोड चार्ज केलेले कण तसेच L-1 च्या आसपासच्या बाह्य कक्षेत असणाऱ्या चुंबकीय क्षेत्राबद्दल माहिती देऊ शकतं.
हेही वाचा -
- Narendra Modi : नरेंद्र मोदींनी घेतली इस्रो प्रमुख एस सोमनाथ यांची भेट, चंद्रयान 3 च्या यशस्वी लँडिंगबद्दल अभिनंदन केलं
- Chandrayaan-3 : सर्व नियोजनानुसार सुरू; 'चंद्रयान' चंद्रावर लँडिंग करतानाचा व्हिडिओ आला समोर
- Chandrayaan 3 : चंद्रयान 3 मधून रोव्हरच ' मुनवॉक' सुरू , चंद्रावरील मातीत उमटवित आहेत ठसे