नवी दिल्ली : काही दिवसांपासून गंगा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मृतदेह वाहून येताना आढळून येत आहेत. या घटनांना पूर्णपणे केंद्र सरकार जबाबदार असल्याची टीका काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. ज्या लोकांनी गंगेमध्ये आपल्या कुटुंबीयांच्या मृतदेहांना सोडून दिले, त्यांची अपरिहार्यता आणि त्रासही समजून घ्यायला हवा, असेही राहुल म्हणाले.
"मला मृतदेहांचे फोटो शेअर करायला आवडत नाही. मात्र, सध्या संपूर्ण जग हे फोटो पाहत आहे. आपण त्या लोकांचे दुःखही समजून घ्यायला हवे, ज्यांच्याकडे आपल्या नातेवाईकांचे मृतदेह गंगेमध्ये सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. या प्रकाराची जबाबदारी ही दुसऱ्या कोणाची नसून, पूर्णपणे केंद्राची आहे"; अशा आशयाचे ट्विट राहुल गांधींनी रविवारी केले.
राहुल यांनी यापूर्वीही गंगेतील मृतदेहांवरुन केंद्रावर टीका केली होती. गंगेच्या वाळूमधील प्रत्येक मृतदेहावरील कपडा म्हणतोय, की मोदी व्यवस्था याच वाळूमध्ये दफन झाली आहे, असे टि्वट राहुल गांधींनी केले आहे. तसेच त्यापूर्वीही "गंगेने बोलवलं आहे, असे म्हणणाऱ्यांनीच आता माँ गंगेला रडवलं आहे", असे ट्विट करत राहुल यांनी केंद्रावर निशाणा साधला होता.
गंगेत आढळले मृतदेह -
गंगेत मृतदेह आढळल्याने राजकारण तापलं आहे. या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने (एनएचआरसी) गुरुवारी उत्तर प्रदेश आणि बिहार सरकारला नोटीस बजावली आहे. आयोगाने दोन्ही राज्यांचे मुख्य सचिव व सचिव, केंद्रीय जल मंत्रालय यांना चार आठवड्यांत कारवाईचा अहवाल देण्यास सांगितले आहे. कोरोना काळामध्ये घरातच मृत्यू झालेल्या, आणि अंत्यसंस्कार होऊ न शकलेल्या मृतदेहांना नातेवाईकांनी गंगेत फेकले असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. बिहारसोबतच उत्तर प्रदेशच्या गाझीपूरमध्येही असेच मृतदेह आढळून आले होते.
राहुल गांधी गेल्या कित्येक दिवसांपासून केंद्रावर कोविडबाबत टीका करत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी पंतप्रधानांना पत्र लिहित, दुसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी काही पर्यायही सुचवले होते.