नवी दिल्ली - शेतकरी आंदोलनाला दोन महिने होत आले असले तरी अद्याप तोडगा निघाला नाही. शेतकरी संघटनांचे नेते आणि सरकारमध्ये चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या असून दहावी फेरी पुढे ढकलण्यात आली आहे. आज (मंगळवार) विज्ञान भवन येथे बैठक होणार होती. मात्र, बैठक उद्या (बुधवार) होणार आहे. याबाबत केंद्रीय कृषी मंत्रालयाने माहिती दिली.
नियोजित वेळापत्रकानुसार आज मंगळवारी बैठक होणार होती. मात्र, आता उद्या दुपारी दोन वाजता विज्ञान भवन येथे बैठक होणार आहे. याआधी १५ जानेवारीला शेतकरी नेते आणि सरकारमध्ये चर्चा झाली होती. मात्र, यातून काहीही तोडगा निघाला नव्हता. शेतकऱ्यांनी औपचारिक गट तयार करून मागण्यांचा प्रस्ताव सरकारला सादर करावा, अशी सुचना केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी केली आहे.
कृषी कायद्यांना स्थगिती देण्यात आली असली, तरीही आमची मागणी कायदे रद्द करण्याची आहे, असे म्हणत शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले आहे. जोपर्यंत कृषी कायदे रद्द केले जात नाहीत, आणि एमएसपी लागू होत नाही, तोपर्यंत आपले आंदोलन सुरुच राहणार असल्याचे शेतकरी संघटनांचे प्रवक्ते राकेश टिकाईत यांनी स्पष्ट केले आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने शेतकरी आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. मात्र, शेतकऱ्यांनी समितीच्या निष्पक्षपातीपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. समितीसोबत कोणतीही चर्चा करणार नसून थेट सरकारशी चर्चा करणार असल्याचा पवित्रा शेतकरी संघटनांनी घेतला आहे.